कोलकाता- ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. या ५ राज्यांपैकी ३ राज्यात सत्तांतर झाले आहे. त्यात पश्चिम बंगालच्या निकालात सत्ताधारी ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाने ममता दिदींची सत्ता उलथावून लावली आहे. या निवडणुकीत अनेक खेळाडू स्टार प्रचारक म्हणून काम करताना दिसत होते. त्यात भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि केकेआर संघातील वेगवान गोलंदाज अशोक दिंडा भाजपाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले आहे. मोयना मतदारसंघात अशोक दिंडा निवडणूक लढवत होते. तिथे १६ हजार २४१ मतांनी त्यांनी विजय मिळवला आहे.
मोयना मतदारसंघात भाजपा उमेदवार अशोक दिंडा यांना १ लाख २७ हजार १६६ मते मिळाली तर त्यांच्याविरोधात उभे राहिलेले टीएमसी उमेदवार चंदन मंडल यांना १ लाख १० हजार ९२५ मते मिळाली आहेत. दिंडा यांनी मोयना मतदारसंघात १६ हजाराहून अधिक मताधिक्यांनी विजय मिळवला आहे. अशोक दिंडा याआधीही मोयना मतदारसंघात आमदार होते. मागील विधानसभा निवडणुकीत दिंडा यांनी या जागेवर टीएमसीचे संग्राम डोलुई यांना हरवले होते. त्यावेळी अशोक दिंडा यांना केवळ १२६० मताधिक्य मिळाले होते. यंदा या जागेवर तगडी टक्कर पाहायला मिळाली होती.
अशोक दिंडा यांचं क्रिकेट करिअर कसं होते?
राजकारणात पाऊल ठेवण्यापूर्वी अशोक दिंडा हे कोलकाता नाइट रायडर्सचे वेगवान गोलंदाज म्हणून प्रसिद्ध होते. दिंडा यांनी ९ डिसेंबर २००९ मध्ये श्रीलंकेविरोधात खेळताना भारतीय संघातील T-20 साठी डेब्यू केले होते. २८ मे २०१० साली त्यांनी झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. दिंडा यांनी १८ एप्रिल २००८ रोजी झालेल्या पहिला आयपीएल सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाकडून खेळला. त्या सामन्यात आरसीबीचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीची विकेट घेऊन दिंडा चर्चेत आला होता.
भाजपा २०० पार, तृणमूलमध्ये हाहाकार...
दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत यंदा मतदारांनी १५ वर्षांपासूनचं ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसचे सरकार पायउतार केले आहे. मतदारांनी २०हून अधिक मंत्र्यांना पराभवाचा धक्का दिला. पश्चिम बंगालमध्ये भाजपाने तब्बल २०६ जागा जिंकून टीएमसीला जोरदार धक्का दिला. या निकालात सत्ताधारी टीएमसीला अवघ्या ८१ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसनेही या निवडणुकीत खाते उघडून २ जागा जिंकल्या आहेत.