सोलापूरच्या 'लेकी'ची WPL मध्ये कमाल; झंझावाती अर्धशतकाने रचला इतिहास

WPL 2024: सध्या महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 07:38 PM2024-02-29T19:38:03+5:302024-02-29T19:38:35+5:30

whatsapp join usJoin us
Kiran Navgire scored 57 off 31 balls with 6 fours and 4 sixes against Mumbai Indians while playing for UP Warriors in WPL 2024 | सोलापूरच्या 'लेकी'ची WPL मध्ये कमाल; झंझावाती अर्धशतकाने रचला इतिहास

सोलापूरच्या 'लेकी'ची WPL मध्ये कमाल; झंझावाती अर्धशतकाने रचला इतिहास

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सध्या महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामाचा थरार रंगला आहे. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, यूपी वॉरियर्स, गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ एका ट्रॉफीसाठी मैदानात आहेत. आयपीएलच्या धर्तीवर सुरू झालेल्या या स्पर्धेने अनेक खेळाडूंना एक नवीन ओळख निर्माण करून दिली. मराठमोळी खेळाडू किरण नवगिरेने बुधवारी स्फोटक खेळी करून आपल्या कर्णधाराचा विश्वास जिंकला. बुधवारी मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात सामना झाला. मूळची सोलापूरची असलेल्या किरणने झंझावाती खेळी करून आपल्या संघाच्या विजयाचे खाते उघडले. 

किरण नवगिरेचा झंझावात 
खरं तर यूपी वॉरियर्सच्या संघाची फलंदाज किरण नवगिरे तिच्या बॅटमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. मूळची सोलापूरची असलेल्या किरणने मागील हंगामात तिच्या बॅटच्या मागे 'MSD 07' असे लिहिले होते. ती भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची जबरा फॅन आहे. धोनीच्या या चाहतीने WPL च्या खेळपट्टीवर कहर माजवला. गतविजेत्या मुंबईला पराभवाची धूळ चारण्यात किरणने मोलाची भूमिका बजावली.

२८ फेब्रुवारीला मुंबई आणि यूपी यांच्यातील WPL सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि शबनम इस्माईल या दोन स्टार खेळाडूंशिवाय खेळत असलेल्या मुंबईने नेट सिव्हरच्या नेतृत्वाखाली निर्धारित २० षटकांत ६ बाद १६१ धावा केल्या. यूपी वॉरियर्सला विजयाचे खाते उघडण्यासाठी १६२ धावांची आवश्यकता होती.

झंझावाती अर्धशतकाने रचला इतिहास 
मुंबईने दिलेले लक्ष्य मोठे नसले तरी ते सोपे देखील नव्हते. अशा स्थितीत यूपी वॉरियर्सची कर्णधार ॲलिसा हिलीने एक चाल खेळली. मोठा डाव आखत तिने ग्रेस हॅरिसच्या जागी किरण नवगिरेला सलामीला उतरवले. हिलीनेही नवगिरेला यासाठी तयार राहण्यास सांगितले होते आणि ती किती तयार होती हे तिच्या फलंदाजीतून दिसून आले. किरणने २५ चेंडूत अर्धशतक झळकावून पुन्हा एकदा आपली क्षमता दाखवून दिली.

किरण नवगिरेने मुंबईविरुद्ध ३१ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांसह ५७ धावा केल्या. म्हणजेच तिने आपल्या डावात केवळ चौकार आणि षटकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या. किरण नवगिरेचे हे WPL मधील दुसरे अर्धशतक आहे. याआधी गेल्या हंगामात तिने गुजरात जायंट्सविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. डब्ल्यूपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारी ती एकमेव खेळाडू आहे, जिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० सामने देखील खेळलेले नाहीत. किरणच्या ५७ धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर यूपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सचा २१ चेंडू आणि ७ विकेट राखून पराभव केला. एकूणच यूपीच्या संघाने १६२ धावांचे लक्ष्य केवळ १६.३ षटकांत पूर्ण केले. 

Web Title: Kiran Navgire scored 57 off 31 balls with 6 fours and 4 sixes against Mumbai Indians while playing for UP Warriors in WPL 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.