Join us  

"धोनी देशाचा आणि झारखंडचा गौरव, त्याच्यासाठी अखेरचा सामना आयोजित करण्यात यावा"

विश्वचषक - 2019च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. परिणामी धोनीने भारतीय संघातले आपले स्थान गमावले. त्यानंतर बराच काळ तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 10:46 PM

Open in App

रांची - गेल्या बऱ्याच दिवसांपासून, धोनीच्या निवृत्तीसंदर्भात सोशल मीडियावर चर्चा सुरू होती मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आज स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच माही अर्थात महेंद्र सिंह धोनीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. विश्वचषक - 2019च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. परिणामी धोनीने भारतीय संघातले आपले स्थान गमावले. त्यानंतर बराच काळ तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच होता.

धोनीच्या निवृत्तीचे वृत्त समजताच चाहते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही धोनीच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया दिला आहे. "धोनी हा देशाचा आणि झारखंडचा गौरव आहे. मला वाटते, की धोनीचा अखेरचा सामना रांची येथे व्हायला हवा. मी बीसीसीआयला विनंती करतो, की धोनीसाठी एक अखेरचा सामना आयोजित करण्यात यावा," अशी मागणी मुख्यमंत्री सोरेन यांनी केली आहे.

धोनीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कर्णधारपदाच्या कारकिर्दीची सुरुवात ही 2007 साली टी-20 विश्वचषकावर नाव कोरून झोकात केली होती. त्यानंतर धोनीने भारतीय संघाच्या एकदिवसीय आणि कसोटी संघाच्या नेतृत्वाची धुराही आपल्या खांद्यावर घेतली. दरम्यान, धोनीने 2011 मध्ये भारताला आयसीसी क्रिकेट विश्वचषक जिंकून दिला होता. त्यानंतर 2013 मध्ये धोनीने भारतीय संघाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकून दिली. अशाप्रकारे आयसीसीच्या मानाच्या तिन्ही स्पर्धांवर नाव कोरणारा धोनी हा एकमेव कर्णधार ठरला आहे. धोनीपूर्वी आणि धोनीनंतर कुठल्याही कर्णधाराला या विक्रमाशी बरोबरी करता आलेली नाही.

धोनी सध्या आगामी आयपीएल हंगामाच्या तयारीत व्यस्त आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या काळात युएईमध्ये खेळवल्या जाणाऱ्या आयपीएल हंगामासाठी धोनी सज्ज आहे. सध्या चेन्नई सुपरकिंग्जमधील सहकाऱ्यांसोबत तो सराव करत आहे. २० ऑगस्टनंतर चेन्नईचा संघ युएईला रवाना होणार आहे.

धोनीने  90 कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना 38.09 च्या सरासरीने 6 शतके व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. तर 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने  50.57 च्या धडाकेबाज सरासरीने 10 हजार 773 धावा फटकावल्या. त्यामध्ये 10 शतके व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. तर ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये माहीने 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत.

फलंदाजीसोबतच धोनीने यष्टीमागूनही भारतीय संघात भरभरून योगदान दिले. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, तर वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत. 

हेही वाचा -

धोनीच्या निवृत्तीची बातमी ऐकताच चाहते 'इमोशनल', अशा अंदाजात म्हणाले 'Miss you'!

MS Dhoni Retirement: माहीच्या कारकीर्दीतील अविस्मरणीय क्षण, ज्यांनी धोनीला बनवले चॅम्पियन कॅप्टन

MS Dhoni Retirement: अशी कामगिरी करणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीझारखंडबीसीसीआयभारत