MS Dhoni Retirement: MS Dhoni is the only captain in the world to do so this record | MS Dhoni Retirement: अशी कामगिरी करणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार

MS Dhoni Retirement: अशी कामगिरी करणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार

नवी दिल्ली - भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून मान मिळवणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. कॅप्टन कूल म्हणून लौकिक असलेल्या धोनीने त्याच्या मैदानावरील धक्कादायक निर्णयांप्रमाणेच आज अचानक निवृ्त्तीची घोषणा करून चाहत्यांना धक्का दिला. दरम्यान, विश्वचषकांसह अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये अजिंक्य ठरलेल्या धोनीने आपल्या आंतराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक विक्रमांची नोंद केली आहे. मात्र त्यापैकी एक विक्रम विशेष आहे.

धोनीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कर्णधारपदाच्या कारकिर्दीची सुरुवात ही २००७ साली टी-२० विश्वचषकावर नाव कोरून झोकात केली होती. त्यानंतर धोनीने भारतीय संघाच्या एकदिवसीय आणि कसोटी संघाच्या नेतृत्वाची धुराही आपल्या खांद्यावर घेतली. दरम्यान, धोनीने २०११ मध्ये भारताला आयसीसी क्रिकेट विश्वचषक जिंकून दिला होता. त्यानंतर २०१३ मध्ये धोनीने भारतीय संघाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकून दिली. अशाप्रकारे आयसीसीच्या मानाच्या तिन्ही स्पर्धांवर नाव कोरणारा धोनी हा एकमेव कर्णधार ठरला आहे. धोनीपूर्वी आणि धोनीनंतर कुठल्याही कर्णधाराला या विक्रमाशी बरोबरी करता आलेली नाही.

दरम्यान, भारतीय संघाला पहिल्यांदाच कसोटी आणि एकदिवसीय क्रमवारीत अव्वलस्थानावर पोहोचवणारा कर्णधार म्हणून मान मिळवणाऱ्या धोनीने कसोटी क्रिकेटमधून आधीच निवृत्ती स्वीकारली होती. मात्र टी-२० आणि एकदिवसीय या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो मैदान गाजवत होता. पण गतवर्षी झालेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकानंतर धोनीला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नव्हती. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू होत्या. 

धोनीने 90 कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना 38.09 च्या सरासरीने 6 शतके व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. तर 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 50.57 च्या धडाकेबाज सरासरीने 10 हजार 773 धावा फटकावल्या. त्यामध्ये 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. तर ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये माहीने 98 सामन्यांत 1617 धावा केल्या.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: MS Dhoni Retirement: MS Dhoni is the only captain in the world to do so this record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.