Jemimah Rodrigues Century :  महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलमध्ये जेमिमा रॉड्रिग्जनं आपल्या वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी साकारली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना जेमिमानं वनडे कारकिर्दीत तिसरे आणि वर्ल्ड कपमधील आपले पहिले शतक झळकावले. ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघासमोर ३३९ धावांचे टार्गेट सेट केल्यावर सलामीच्या बॅटर स्वस्तात आटोपल्यावर तिच्या भात्यातून ही दमदार खेळी आली.  
 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 
जेमीच्या शतकासह वर्ल्ड कपच्या नॉकआउट लढतीत दुसऱ्यांदा असं घडलं
फायनलचं स्वप्न कायम ठेवण्यासाठी जेमिमा रॉड्रिग्सनं आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी साकारताना ११५ चेंडूत शतक साजरे केले. अर्धशतकानंतर शांत राहिलेली जेमिमा शतकानंतरही सेलिब्रेशन करणे टाळले. वर्ल्ड कप स्पर्धेतील नॉकआउट लढतीत एका सामन्यात दोन वेगवेगळ्या खेळाडूंचे शतक होण्याची ही दुसरी वेळ ठरली. याच सामन्यात जेमिमा रॉड्रिग्जआधी पहिल्यांदा फलंदाजी करताना फीबी लिचफिल्डनं शतकी खेळी साकारली होती. याआधी २०२२ च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये एलिसा हीली आणि नेट सायव्हर ब्रंट यांनी शतकी खेळी केल्याचे पाहायला मिळाले होते.   
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
गत हंगामात संघात स्थान मिळालं नव्हते, यंदाच्या हंगामात एका मॅचमध्ये बाकावर बसवलं, पण...
गत वर्ल्ड कप स्पर्धेत संघातही स्थान न मिळालेल्या जेमिमा रॉड्रिग्जसाठी यंदाच्या हंगामात एका सामन्यात बाकावर बसवण्यात आले होते. पण संधी मिळाल्यावर तिसऱ्या क्रमांकावर तिने आपल्यातील धमक दाखवून संघाला विजय मिळवून देणारी खेळी साकारली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तिने १३४ चेंडूचा सामना करताना १४ चौकाराच्या मदतीने १२७ धावांची नाबाद खेळी केली. तिने हरमनप्रीत कौरच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी भारताकडून वर्ल्ड कप स्पर्धेतील नॉकआउटमध्ये सर्वोच्च भागीदारीचा रेकॉर्डही रचला. ही भागीदारी सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरली.