Join us

नडला त्याला तोडला! १९ वर्षाचं पोरगं भिडायला आलं, जसप्रीत बुमराहने थेट घरी पाठवून दिलं... (VIDEO)

Jasprit Bumrah Sam Konstas Fight Video Ind vs Aus 5th Test: बुमराह वैतागलेला असताना नॉन स्ट्राईकवरून सॅम कॉन्स्टास त्याच्याशी भांडायला आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 14:25 IST

Open in App

Jasprit Bumrah Sam Konstas Fight Video Ind vs Aus 5th Test: बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव १८५ धावांवर आटोपला. भारताकडून रिषभ पंतने सर्वाधिक ४० धावा तर रवींद्र जाडेजाने झुंजार २६ धावांची खेळी केली. शेवटच्या टप्प्यात कर्णधार जसप्रीत बुमराहने केलेल्या २२ धावांमुळे भारताने कशीबशी १८५ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय फलंदाजांना छाप पाडता आली नाही. त्यानंतर पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ९ धावांवर उस्मान ख्वाजाची १ विकेट गमावली. या विकेटआधी मैदानावर तुफान राडा झाला. त्याचा व्हिडीओदेखील तुफान व्हायरल होत आहे.

दिवसाचा खेळ संपण्यासाठी अवघी काही मिनिटं शिल्लक होती. ऑस्ट्रेलियाच्या संघाचे सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि सॅम कॉन्स्टास फलंदाजी करत होते. उस्मान ख्वाजा जाणूनबुजून वेळकाढूपणा करत होता, त्यामुळे बुमराह त्याच्यावर चिडला. बुमराह चिडल्याचे पाहून नॉन स्ट्राइकवर असलेला सॅम कॉन्स्टास त्याच्याशी वाद घालू लागला. दोघे आमने-सामने येणार इतक्यात अंपायरने मध्ये पडून भांडणं थांबवलं. त्यानंतर दिवसाच्या खेळाचा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी बुमराहने रन अप घेतला. ख्वाजाने चेंडू खेळला, पण त्याच्या बॅटची कट लागून तो झेलबाद झाला. भारताला अपेक्षित असलेली कांगारुंची पहिली विकेट दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर मिळाली. त्यानंतर सर्वप्रथम बुमराहने कॉन्स्टासकडे पाहून जल्लोष केला. त्यानंतर संपूर्ण भारतीय संघ कॉन्स्टासच्या समोर येऊ विकेटचे सेलिब्रेशन करताना दिसला. या साऱ्या नाट्यमय घडामोडींचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. पाहा व्हिडीओ-

---

दरम्यान, रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचा हंगामी कर्णधार जसप्रीत बुमराह याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सिडनीच्या खेळपट्टीवर भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. यशस्वी जैस्वाल (१०), केएल राहुल (४), शुबमन गिल (२०), विराट कोहली (१७) झटपट तंबूत परतले. रिषभ पंत आणि रवींद्र जाडेजा यांच्यात छोटेखानी भागीदारी झाली. पण पंत ४० धावा काढून तर नितीश रेड्डी शून्यावर माघारी परतला. जाडेजाने २६ तर वॉशिंग्टन सुंदरने १४ धावांची झुंज दिली. शेवटच्या टप्प्यात कर्णधार जसप्रीत बुमराहने (२२) फटकेबाजीचा प्रयत्न करत संघाला १८५ धावांपर्यंत मजल मारून दिली.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाजसप्रित बुमराहविराट कोहलीआॅस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघऑफ द फिल्डभारतीय क्रिकेट संघ