आयपीएल यंदाचा हंगाम आता सर्वात रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्लेऑफचे तिकीट मिळवले आहे. मात्र, चौथ्या आणि शेवटच्या स्थानासाठीची लढत चुरशीची झाली असून एका स्थानासाठी पंजाब किंग्स , राजस्थान रॉयल्स , चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स हे पाच संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे या पाचही संघासाठी त्यांचे पुढील सामने डू ऑर डाय असतील.
सध्या पंजाब किंग्सकडे सर्वात मोठी आघाडी आहे. १३ सामन्यांमधून १३ गुणांसह हा संघ चौथ्या स्थानावर आहे. त्यांचा शेवटचा सामना आधीच स्पर्धेतून बाहेर पडलेल्या लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आहे. जर. पंजाबने हा सामना जिंकला, तर त्यांचे १५ गुण होतील आणि केवळ राजस्थान रॉयल्सच त्यांना मागे टाकू शकेल. राजस्थानची कहाणी सर्वात रंजक आहे. संघाचे अजून दोन सामने बाकी आहेत आणि प्लेऑफपर्यंतचा त्यांचा मार्ग पूर्णपणे त्यांच्या हातात आहे. जर राजस्थानने लखनौ आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांना हरवले, तर ते थेट प्लेऑफसाठी पात्र ठरतील. मात्र, एक जरी पराभव झाला तरी त्यांच्यासाठी गोष्टी कठीण होऊ शकतात.
चेन्नई सुपर किंग्सचा मार्ग आता अत्यंत गुंतागुंतीचा झाला आहे. १३ सामन्यांमधून १२ गुणांसह, संघाला गुजरात टायटन्सविरुद्धचा आपला शेवटचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. शिवाय त्यांना इतर संघाच्या कामिगरीवर अवलंबून राहावे लागणार आहे. दिल्ली कॅपिटल्स यांनाही आपल्या पुढील सामन्यात चांगली कामगिरी करावी लागेल. तसेच इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागणार आहे.
कोलकाता नाइट रायडर्सची कहाणीही तितकीच रोमांचक आहे. त्यांची पहिली आशा पंजाबच्या पराभवावर अवलंबून आहे. जर पंजाब जिंकला, तर कोलकाताला नेट रन रेटवर अवलंबून राहावे लागेल. हे साध्य करण्यासाठी, त्यांना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांना पराभूत करावे लागेल. शिवाय, राजस्थानला एका सामन्यात पराभूत व्हावे लागेल.