Sourav Ganguly On IPL's Restart : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएल स्पर्धा (IPL 2025) स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. धर्मशाला येथील मैदानात रंगललेला पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना थांबवल्यावर दुसऱ्या दिवशीच आयपीएल स्पर्धा आठवड्याभरासाठी स्थगित करण्यात आल्याची अधिकृत घोषणा बीसीसीआयकडून करण्यात आली. भारत-पाक यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने हा निर्णय आधीच घ्यायला हवा, होता असाही सूर उमटताना दिसतोय. त्यात आठवड्याभरानंतर स्पर्धा पुन्हा सुरु करणे शक्य होईल का? हा नवा प्रश्न चर्चेत आहे. यासंदर्भात बीसीसीआयचा माजी अध्यक्ष आणि दिग्गज क्रिकेटर सौरव गांगुलीनं मत व्यक्त केले आहे. पाकिस्तान अधिक काळ भारताचा दबाव सहन करू शकत नाही, त्यामुळे आयपील स्पर्धा लवकर पुन्हा सुरु होईल, असे गांगुलीने म्हटले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आशा करुयात की, IPL स्पर्धा लवकरच पुन्हा सुरु होईल…
सौरव गांगुली एएनआयशी संवाद साधताना म्हणाला आहे की, "देशात युद्धजन्य परिस्थिती आहे. आयपीएलमध्ये अनेक भारतीय आणि विदेशी खेळाडू सहभागी आहेत. त्यामुळेच बीसीसीआयला आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आयपीएल स्पर्धा लवकरच पुन्हा सुरु होईल, अशी आशा करुयात. कारण स्पर्धा महत्त्वपूर्ण टपप्यात आहे.
रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
'पाकिस्तान फार काळ दबाव सहन करून शकणार नाही'
सौरव गांगुली पुढे म्हणाला की, बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागला कारण, स्पर्धेतील सामने हे, धर्मशाला, चंदीगड, दिल्ली, राजस्थान आणि जयपूर याठिकाणी आहेत. जे घडलं त्या परिस्थितीनुसार, स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेणे गरजेचे होते. ही परिस्थितीत लवकर सुधारेल आणि आयपीएलमधील सामने पुन्हा खेळवले जातील. पाकिस्तान फार काळ दबाव सहन करू शकणार नाही, त्यामुळे बीसीसीआय IPL स्पर्धा सुरळीत पार पाडू शकेल, असे मतही गांगुलीने व्यक्त केले आहे.
जर भारत-पाक यांच्यातील तणाव कायम राहिला तर काय?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीत अधिक काळ कायम राहिली तर बीसीसीआयला आठवड्याभरात पुन्हा स्पर्धा सुरु करणं शक्य होणार नाही. या परिस्थितीत बीसीसीआयकडे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ही स्पर्धा पूर्ण करण्याची एक विंडो उपलब्ध असेल. या दरम्यान भारताचा बांगलादेश दौरा आणि आशिया कप स्पर्धाही नियोजित आहे. भारत-पाक यांच्यातील तणावामुळे भारताच्या बांगलादेश दौऱ्यावरही संकटाचे ढग दाटून आले आहे. याशिवाय आशिया कप स्पर्धेतील सहभागाबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या परिस्थितीत बोर्ड आयपीएल स्पर्धा पूर्ण करण्याचा प्लॅन आखू शकते.