IPL 2025 RCB vs PBKS Final Match Player to Watch Shreyas Iyer Punjab Kings इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या हंगामात प्रीती झिंटाच्या सह मालकीच्या पंजाब किंग्ज संघानं दुसऱ्यांदा फायनल गाठली आहे. 'बडे मंच का सरपंच' अर्थात कॅप्टन श्रेयस अय्यर १७ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवेल, असा विश्वास फ्रँचायझी संघाच्या मालकीणीसह पंजाबच्या चाहत्यांमध्येही दिसतोय. फायनल आधी 'बस जितना है..' हा हॅशटॅग क्रिएट केल्यावर पंजाबी शेर प्रतिस्पर्ध्यांना ढेर करून जेतेपद पटकवणार का? ते पाहण्याजोगे असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्रीती-शाहरूख अन् तो..
आयपीएलच्या पर्वाची सुरुवात होण्याआधी पाच वर्षे आधी २००३ मध्ये प्रीती झिंटाची प्रमुख भूमिका असलेला 'कल हो ना हो' नावाचा चित्रपट रिलीज झाला होता. त्यावर्षी हा सिनेमा हिंदी सिनेसृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही ठरला. हा संदर्भ देण्यामागचं कारण, या सिनेमातील प्रीती झिंटाचा नायक शाहरुख खान अन् आयपीएलमध्ये नवा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर असणारा पंजाब किंग्जचा नायक श्रेयस अय्यर यांच्यात एक खास कनेक्शन आहे. एवढेच नाही तर सिनेमाच्या "कल हो ना हो..." टायटल साँगमध्ये फ्रँचायझी संघाची आयपीएलच्या इतिहासातील प्रवासाची किंचित का होईना पण एक झलक दिसून येत.
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
शाहरूखच्या संघाला चॅम्पियन करणारा चेहरा झालाय प्रीतीच्या PBKS चा मोहरा
२००८ च्या हंगामापासून डिंपल गर्ल प्रीती झिंटा पंजाब फ्रँचायझी संघासोबत आहे. प्रत्येक हंगामात पंजाबचा संघ तगड्या संघ बांधणीसह मैदानात उतरला. पण अजूनपर्यंत एकदाही ट्रॉफी काही त्यांच्या हाती लागली नाही. 'कल हो ना हो' चित्रपटातील कथानकामध्ये निराशेच्या गर्तेत सापडलेल्या नैनाच्या म्हणजेच प्रीतीच्या आयुष्यात शाहरुख खानच्या (अमन माथूर) एन्ट्रीनं वेगळं वळण आल्याचे पाहायला मिळाले होते. आता आयपीएलमध्ये शाहरूख खानच्या संघाला चॅम्पियन करणारा श्रेयस अय्यर प्रीती झिंटासह पंजाबचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी लढताना दिसतोय. आयपीएलच्या इतिहासात जे कुणाला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करून दाखवलंय. तीन वेगवेगळ्या फ्रँचायझी संघाला फायनलमध्ये नेणारा तो पहिला कर्णधार ठरलाय. आता दोन वेगवेगळ्या फ्रँचायझीला चॅम्पियन करणारा कर्णधार ही छाप सोडण्याच्या इराद्याने तो मैदानात उतरेल.
'बस जितना है...' यापलिकडची गोष्ट
प्रत्येक हंगामात प्रीती झिंटा "हर घड़ी बदल रही है रूप ज़िंदगी छाँव है कभी कभी है धूप ज़िंदगी..." गाणं म्हणत संघाला चीअर करताना दिसली. पण प्रत्येक वेळी फ्रँयायझी संघाला चटका अन् फटकाच बसला. यंदाच्या हंगामा आधी तिने बहुदा "चाहे जो तुम्हें पूरे दिल से... मिलता है वह मुश्किल से... ऐसा जो कोई कहीं है... बस वही सबसे हसीं है...उस हाथ को तुम थाम लो.. या ओळींवर भर देत अय्यरला आपल्या संघाचा 'सरपंच' करण्याचा निर्णय घेतला. गत हंगामात शाहरुख खानच्या संघाला चॅम्पियन करणाऱ्या श्रेयस अय्यरसाठी पंजाबनं २६.७५ कोटी रुपये एवढी मोठी रक्कम मोजली. तो आयपीएलच्या इतिहासातील पंत (२७) नंतर दुसरा महागडा खेळाडू ठरला. अय्यरनं हा निर्णय सार्थ ठरवल्याचे दिसते. फायनलसाठी मैदानात उतरण्याआधी प्रीती झिंटा आपल्या संघातील खेळाडूंना आणि खासकरून भरवशाच्या कॅप्टन श्रेयस अय्यरला 'बस जितना है...' ही भावना बोलून दाखवेलच, पण "जो है समाँ...कल हो ना हो..." हे देखील तिच्या मनात असेल. जे श्रेयस अय्यरला बोलून दाखवण्याची गरजही नसेल. कारण तो याचं महत्त्व जाणतोय.