प्लेऑफ्समधील अव्वल दोनसाठी सुरु असलेल्या लढतीत पंजाब किंग्जच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाला निर्धारित २० षटकात १८४ धावांवर रोखले. पहिल्या ३ षटकात एकही विकेट न घेतलेल्या अर्शदीप सिंगनं अखेरच्या षटकात सेट झालेल्या मुंबईकरांसमोर परफेक्ट यॉर्कर लेंथ चेंडूचा मारा केला. या षटकात त्याने आधी मोठी फटकेबाजी करण्याच्या तयारीत असलेल्या नमन धीरला चालते केले. एवढ्यावरच न थांबता त्याने शेवटच्या चेंडूवर दमदार अर्धशतक झळकावणाऱ्या सूर्यकुमार यादवलाही पायचित केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अखेरच्या षटकात ३ धावा खर्च करत घेतल्या २ महत्त्वाच्या विकेट्स
आपल्या डावातील १९ व्या षटकातच मुंबई इंडियन्सच्या संघाने ५ विकेट्सच्या मोबदल्यात धावफलकावर १८१ धावा लावल्या होत्या. डेथ ऑव्हर्स स्पेशलिस्ट अन् टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज अशी छाप सोडणाऱ्या अर्शदीप सिंग पंजाबकडून शेवटचे षटक घेऊन आला. सूर्यकुमार यादवसह नमन धीरही चांगली फटकेबाजी करत होता. पण या तगड्या फलंदाजांसमोर अर्शदिपनं सिंग इज किंग शो दाखवला. पहिल्याच चेंडूवर आखूड टप्प्यावर टाकलेल्या चेंडूवर त्याने नमन धीरला २० (१२) प्रियांश आर्यकरवी झेलबाद केले. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या मिचेल सँटनरनं दुसऱ्याच चेंडूवर एक धाव करत सूर्याला स्ट्राइक दिले. तोऱ्यात बॅटिंग करणाऱ्या सूर्यकुमार यादवला अर्शदीप सिंगनं अप्रतिम यॉर्कर टाकत दोन चेंडू निर्धाव टाकले. पाचव्या चेंडूवर सूर्यानं दोन धावा घेतल्या. पण अखेरच्या चेंडूवर अर्शदीप त्याच्यावर भारी पडला. सूर्यकुमार यादव पायचित झाला. त्याने ३९ चेंडूत ५७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अर्शदीप सिंगनं ४ षटकात २८ धावा खर्च करत २ विकेट्स घेतल्या.
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून कुणी किती धावांचे योगदान दिले?
सूर्यकुमार यादव आणि नमन धीरशिवाय मुंबई इंडियन्सकडून सलामीवीर रायन रिकल्टन याने २० चेंडूत २७ तर रोहित शर्मानं २१ चेंडूत २४ धावांचे योगदान दिले. तिलक वर्मा अवघ्या एका धावेवर बाद झाल्यावर विल जॅक्सनं २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ८ चेंडूत १७ धावा केल्या. हार्दिक पांड्याने १५ चेंडूत २ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने २६ धावांची खेळी केली.