IPL 2025 MI vs LSG : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पहिल्या चार सामन्यात फक्त एक विजय मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सचा संघाने एकदम धमाकेदार कमबॅक केले आहे. वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात लखनौ सुपर जाएंट्सला चारीमुंड्याचित करत मुंबई इंडियन्सच्या संघाने गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतलीये. घरच्या मैदानात पहिल्यांदा फलंदाजी करताना रायन रिकल्टन आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकासह अन्य फलंदाजांनी केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाने लखनौ विरुद्धची लढाई २०० पारची केली होती. निर्धारित २० षटकात ७ बाद २१५ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना लखनौचा संघ १६१ धावांत आटोपला. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि विल जॅक्ससह कॉर्बिन बॉशच्या भेदक माऱ्यासमोर लखनौचे फलंदाज हतबल ठरले. मुंबई इंडियन्सचा संघ मागील काही हंगामात संघर्ष करताना पाहायला मिळाले आहे. पण यंदाच्या हंगामात खराब सुरुवातीनंतर ट्रॅकवर येत पाच वेळचा चॅम्पियन संघ खऱ्या अर्थानं दिमाखदार खेळ करताना दिसत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून दोघांची अर्धशतकी खेळी
वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात लखनौचा कर्णधार रिषभ पंत याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या रुपात पॉवर प्लेमध्ये संघाने चांगली सुरुवातही केली. पण त्यानंतर रायन रिकल्टन याने लखनौच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. त्याने ३२ चेंडू ६ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ५८ धावांची दमदार खेळी केली. त्याच्याशिवाय सूर्यकुमार यादवनं २८ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ५४ धावांची खेळी केली. या दोघांच्या अर्धशतकाशिवाय रोहित शर्मा १२ (५) विल जॅक्स २९ (२१), नमन धीर २५(११)*, कॉर्बिन बॉश २० (१०) यांनी उपयुक्त खेळी करत संघाच्या धावफलकावर ७ विकेट्सच्या मोबदल्यात २१५ धावा लावल्या.
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
बुमराहसह बोल्टचा भेदक मारा, MI चा पुन्हा दिसला चॅम्पियनवाला तोरा
या धावसंख्येचा पाठलाग करताना मिचेल मार्श आणि एडन मार्करम या जोडीनं लखनौच्या डावाची सुरुवात केली. जसप्रीत बुमराहनं एडन मार्करमला ९ (११) स्वस्तात माघारी धाडत लखनौला मोठा धक्का दिला. विल जॅक्सनं एकाच षटकात निकोल पूरन २७ (१५) आणि रिषभ पंत ४ (२) यांची विकेट घेत लखनौच्या अडचणी वाढवल्या. जसप्रीत बुमराहने मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. याशिवाय ट्रेंट बोल्टनंही आपल्या खात्यात ३ विकेट्स जमा केल्या. मुंबई इंडियन्सकडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या कॉर्बिन बॉश याने बॅटिंगनंतर बॉलिंगमध्ये धमक दाखवत एक विकेट घेतली. बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीत भारी कामगिरी करत मुंबई इंडियन्सच्या संघाने पुन्हा एकदा चॅम्पियन होण्यासाठी संघ तयार असल्याचे संकेतच या विजयासह दिले आहेत.
Web Title: IPL 2025 MI vs LSG Mumbai Indians Win Five In A Row Bumrah Stars With 4 Wickets AfterSuryakumar Yadav And Rickelton Half Centuries
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.