IPL 2025 MI vs CSK 38th Match : रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या धमाकेदार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाने वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा धुव्वा उडवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाकड़ून रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे यांनी अर्धशतकी खेळीसह संघाच्या धावफलकावर १७६ धावा लावत मुंबई इंडियन्ससमोर १७७ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. रिकल्टनच्या रुपात पहिली विकेट गमावल्यावर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव जोडी जमली. या दोघांनी १६ व्या षटकातील चौथ्या चेंडूवरच संघाचा विजय निश्चित केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जड्डूसह शिवम दुबेच्या भात्यातून आले अर्धशतक
वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेख रशीद आणि रचिन रविंद्र या जोडीनं चेन्नई सुपर किंग्जच्या डावाची सुरुवात केली. CSK च्या धावफलकावर १६ धावा असताना अश्वनी कुमार याने रचिनला तंबूचा रस्ता दाखवला. शेख रशीद १९ (२०) आणि आयुष म्हात्रे ३२ (१५) हे युवा फलंदाज तंबूत परतल्यावर जडेजा आणि शिवम दुबे जोडी जमली. दोघांनी अर्धशतकी खेळी करत संघाच्या धावफलकावर आव्हानात्मक धावसंख्या उभारली. जडेजाने ३५ चेंडूत नाबाद ५३ धावांची खेळी केली. शिवम दुबेनं २५ चेंडूत ३२ धावा केल्या. या दोघांच्या खेळीच्या जोरावर चेन्नईच्या संघाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात १७६ धावा केल्या होत्या.
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
हंगामात पहिल्यांदाच सलामी जोडीनं रचली अर्धशतकी भागीदारी
या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन जोडीनं MI संघाला धमाकेदार सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी रचली. यंदाच्या हंगामात पहिल्यांदा मुंबई इंडियन्सच्या सलामी जोडीनं अर्धशतकी भागीदारी केली. सातव्या षटकात रियान रिकल्टन १९ चेंडूत २४ धावा करून तंबूत परतला.
मग CSK ला पुरुन उरली MI ची रोहित-सूर्या जोडी
एक विकेट गमावल्यावर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार जोडी जमली. रोहितनं यंदाच्या हंगामातील पहिले अर्धशतक झळकावताना ४५ चेंडूत नाबाद ७६ धावांची खेळी केली. यात त्याच्या भात्यातून ४ चौकारांसह ५ षटकार आल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूला सूर्याने ३० चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने २२६.६७ च्या स्ट्राइक रेटसह ६८ धावा कुटल्या. सलग दोन षटकार मारत त्याने १६ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर मॅच संपवली. मुंबई इंडियन्सच्या संघाने ९ विकेट्स आणि २६ चेंडू राखून दिमाखदार विजय नोंदवत यंदाचा हंगाम गाजवण्यासाठी तयार आहोत, असा संदेशच या विजयातून दिला आहे.