IPL 2023, Punjab Kings vs Mumbai Indians Live Marathi : पंजाब किंग्सने मुंबईत येऊन मुंबई इंडियन्सवर थरारक विजयाची नोंद केली होती. अर्शदीप सिंगच्या 'यष्टितोड' गोलंदाजीने वानखेडेवर मुंबईला हार मानावी लागली होती. आज त्या पराभवाची मुंबईने सव्याज परतफेड केली. पंजाब किंग्सने विजयासाठी ठेवलेले २१५ धावांचे लक्ष्य MI ने सहज पार केले. सूर्यकुमार यादव ( Suryakumar yadav) आणि इशान किशन ( Ishan Kishan) यांचे मोहालीत वादळ घोंगावले. त्यांच्या फटकेबाजीने PBKS चे गोलंदाज लाईन लेंथ विसरलेले दिसले. प्रत्येक चेंडू हा सीमारेषेला चुंबन घेताना दिसला. तिलक वर्मा व टीम डेव्हिडने मॅच फिनिश केली. अर्शदीपने आज ३.५ षटकांत ६६ धावांत १ विकेट घेतली. तो महागडा गोलंदाज ठरला.
डिप्रेशनमध्ये गेलेल्या महाराष्ट्राच्या पोराला PBKS ने दिला आधार; त्यानेच मुंबई इंडियन्सला केले बेजार
तगडे लक्ष्य समोर असताना रोहित शर्माने तिसराच चेंडू हवेत उडवला, परंतु मॅथ्यू शॉर्ट झेल घेण्यासाठी सज्ज होता. रिषी धवनने हिटमॅनला भोपळ्यावर माघारी पाठवले. रोहित आयपीएलमध्ये सर्वाधिक १५ वेळा शून्यावर बाद झाला आहे आणि त्याने दिनेश कार्तिक, सुनील नरीन व मनदीप सिंग यांच्या नावावर असलेल्या नकोशा विक्रमाशी बरोबरी केली. त्यानंतर इशान किशन व कॅमेरून ग्रीन यांनी अर्धशतकी भागीदारी करताना पॉवर प्लेमध्ये ५४ धावा करून दिल्या. सहाव्या षटकात नॅथन एलिसच्या गोलंदाजीवर ग्रीन ( २३) झेलबाद झाला. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सूर्यकुमार यादव मैदानावर उतरला. सूर्या व इशान या जो़डीने पंजाबच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना २९ चेंडूंत ५० धावांची भागीदारी केली.
तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सने पियूष चावला ( २-२९) च्या जोरावर पंजाब किंग्सला सुरूवातीला धक्के दिले, परंतु त्यांच्या अन्य गोलंदाजांना अपयश आले. PBKS च्या जितेश शर्मा व लिएम लिव्हिंगस्टोन यांनी MIच्या गोलंदाजांना बेक्कार चोपले. प्रभसिमरन सिंग ( ९) लगेच माघारी परतल्यानंतर शिखर धवन ( ३०) आणि मॅथ्यू शॉर्ट ( २७) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३५ चेंडूंत ४९ धावांची भागीदारी केली. जितेश २७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४९ धावांवर नाबाद राहिला. लिव्हिंगस्टोनने ४२ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ८२ धावा केल्या व जितेशसोबत ५३ चेंडूंत ११९ धावांची भागीदारी केली. पंजाबने ३ बाद २१४ धावा केल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"