डिप्रेशनमध्ये गेलेल्या महाराष्ट्राच्या पोराला PBKS ने दिला आधार; त्याने MI ला केले बेजार!

IPL 2023, PBKS vs MI : अडचणीत सापडलेल्या पंजाब किंग्सला आज जितेश शर्मा व लिएम लिव्हिंगस्टोन या जोडीने सावरले. जितेश २७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४९ धावांवर नाबाद राहिला. लिव्हिंगस्टोनने ४२ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ८२ धावा केल्या व जितेशसोबत ५३ चेंडूंत ११९ धावांची भागीदारी करून पंजाबला ३ बाद २१४ धावांचा डोंगर उभा करून दिला.

जितेशचा जन्म हा महाराष्ट्रातल्या अमरावती येथील... जितेशचे वडील मूळचे हिमाचल प्रदेशातल्या कांगडा जिल्ह्यातले आणि आई अमरावतीतली. जितेश आणि नितेश या दोन्ही भावांचा जन्म अमरावतीतलाच. त्यांचे वडील सोळाव्या वर्षापासून अमरावतीतच राहत होते आणि त्यांचा बिझनेस होता, अशी माहिती नितेशचा एका मुलाखतीत दिली होती.

जितेश लहानपणापासूनच क्रिकेट खेळायचा; त्याला योग्य मार्गदर्शन मिळायला हवं असं वडिलांना वाटलं. म्हणून त्यांनी त्याला श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात पाठवलं. त्याशिवाय अमरावतीत (Amaravati) संत गजानन क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि श्री क्रिकेट अ‍ॅकॅडमी या दोन संस्थाही आहेत. जितेशने क्रिकेटला इतकं वाहून घेतलं, १२वीनंतर त्याने शिक्षणालाही रामराम ठोकला.

विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (Vidarbha Cricket Association) नागपूरमधल्या क्रिकेट अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष असताना नील डी कोस्टा प्रत्येक जिल्ह्यात जाऊन नव्या टॅलेंटचा शोध घेत होते. त्यातच डी कोस्टा यांना जितेश सापडला. त्यांनी अ‍ॅकॅडमीसाठी त्याची निवड केली. त्यानंतर जितेशने मागे वळून पाहिलं नाही. अंडर-१६, अंडर-१९ टीम्ससह जितेश रणजीमध्ये विदर्भ टीमकडून खेळला.

जितेशला सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती आणि या संधीचं त्याने सोनं केलं; मात्र आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी (Mega Auction) खेळल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याला विदर्भाच्या संघातून वगळण्यात आलं. त्यानंतर तो डिप्रेशनमध्ये गेला होता. परंतु ऑक्शनमध्ये पंजाब किंग्जने जितेशला आपल्या टीममध्ये समाविष्ट केलं आणि त्याच्या कारकिर्दीचा नवा मार्ग खुला झाला.

२०१६ मध्येदेखील तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये हो,मात्र २०१८ मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला रिलीज केलं आणि त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. २०१८ नंतर त्याला कोणत्याही फ्रँचायझीने मूळ किमतीतदेखील त्याला विकत घेतलं नाही. त्यामुळे जितेश निराश झाला होता.

आपली क्रिकेटची कारकीर्द संपली असं त्याला वाटू लागलं होतं; मात्र तो अशा स्थितीत असताना यंदाच्या आयपीएलच्या ऑक्शनमध्ये पंजाब किंग्जने त्याला २० लाखांच्या मूळ किमतीत खरेदी करून खेळण्याची संधी दिली. यामुळे जितेशची उमेद वाढली आणि त्याने पंजाब किंग्जकडून मिळालेल्या या संधीचं सोनं करून दाखवलं.

जितेश शर्माने यंदाच्या आयपीएलमध्ये १० सामन्यांत २३८ धावा चोपल्या आहेत. आयपीएलच्या २२ सामन्यांत त्याच्या नावावर ४७३ धावा आहेत. मागील पर्वात त्याने १२ सामन्यांत २३४ धावा केल्या होत्या.