Join us

IPL 2018 : पंजाबच्या विजयासाठी मालकीणबाई प्रीतीने गुपचूप काय केलं बघा!

ख्रिस गेल नावाच्या अस्त्रामुळे मालकीणबाई प्रीती झिंटाला विजयाची स्वप्नं पडू लागली आहेत, पण सलगच्या दोन पराभवांमुळे ती थोडी काळजीत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2018 13:25 IST

Open in App

इंदूरः आयपीएलच्या ११व्या पर्वात खणखणीत सुरुवात करणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबला सलग दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागल्यानं संघाची मालकीण अभिनेत्री प्रीती झिंटा अस्वस्थ झालीय. मनातील निराशेचं मळभ दूर व्हावं, नवं बळ - आत्मविश्वास मिळावा आणि आजचा सामना पंजाबने जिंकावा, यासाठी तिनं अगदी गुपचूप विघ्नहर्त्या गणपती बाप्पाला साकडं घातलं. पण, तिच्या या 'टेम्पल रन'चा व्हिडीओ तितकाच गुपचूपपणे व्हायरल झाला आहे.

आयपीएल स्पर्धेत पंजाबला २०१४ मध्ये जेतेपदानं हुलकावणी दिली होती. ते वर्षं वगळता, इतर पर्वांमध्ये या 'किंग्ज'चा पराभव ठीकठाकच राहिलाय. यावर्षी मात्र ख्रिस गेल नावाच्या अस्त्रामुळे मालकीणबाई प्रीती झिंटाला विजयाची स्वप्नं पडू लागली आहेत. प्रत्येक सामन्यात ती आपल्या शिलेदारांना चीअर-अप करण्यासाठी हजर असते. तिचा उत्साह ओसंडून वाहत असतो. आठपैकी पाच सामन्यात या 'डिंपल गर्ल'ची खळी चांगलीच खुलली होती. पण, गेले दोन सामने - हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध पंजाबचा पराभव झाल्यानं ती थोडी काळजीत आहे. आज राजस्थानला हरवल्यास प्ले-ऑफच्या दिशेनं पंजाबचं एक पाऊल पुढे पडेल. या विजयासाठी प्रीतीनं गणरायाला साद घातलीय.

इंदूरमधील प्रसिद्ध खजराना गणेश मंदिरात जाऊन प्रीतीनं बाप्पाला गाऱ्हाणं घातलं. कुणी आपल्याला ओळखू नये म्हणून तिनं चेहरा ओढणीने झाकला होता. पण, दर्शन घेताना तिनं ओढणी बाजूला केली आणि ही प्रीती असल्याचं अन्य भाविकांच्या लक्षात आलं. पण, फोटो किंवा व्हिडीओसाठी गर्दी न करण्याचं आवाहन प्रीतीनं चाहत्यांना केलं. तरीही, काही जणांनी गुपचूप तिचे फोटो काढलेच. पुजारी अशोक भट्ट यांनी प्रीतीच्या या गणेश दर्शनाचं सीसीटीव्ही फुटेजही फेसबुकवरून शेअर केलंय. आता बाप्पा प्रीतीला पावतो का, तिची खळी खुलते का, हे संध्याकाळी कळेलच. 

टॅग्स :आयपीएल 2018प्रीती झिंटाकिंग्ज इलेव्हन पंजाबराजस्थान रॉयल्समुंबई इंडियन्स