India U19 vs Bangladesh U19 , Final :भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात अंडर १९ आशिया कप स्पर्धेतील अंतिम सामना खेळवण्यात येत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार मोहम्मद अमान याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला १९८ धावांवर रोखले आहे. फायनल बाजी मारुन ट्रॉफी उंचावण्यासाठी भारतीय अंडर १९ संघाला आता १९९ धावा करायच्या आहेत.
गोलंदाजीत हार्दिक राजसह या गोलंदाजांनी सोडली छाप
भारताकडून हार्दिक राजसह युधिजित गुहा आणि चेतन शर्मा यांनी उत्तम गोलंदाजी करताना प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. याशिवाय कार्तिकेया आणि आयुष म्हात्रे आणि किरण चोरमले यांनी प्रत्येकी १ - १ विकेट्स घेतली. युधजित गुहानं ९.१ षटकात २९ धावा खर्च केल्या. २ विकेट्स आपल्या खात्यात जमा करताना त्याने एक मेडन ओव्हरही टाकली. चेतन शर्मानं १० ओव्हरच्या कोट्यात ४८ धावा खर्च करून दोन विकेट्स मिळवल्या. हार्दिकनंही१० षटकांचा कोटा पूर्ण करताना ४८ धावा खर्च केल्या. निखिल कुमार याने ५ षटकांची गोलंदाजी करताना एक निर्धाव षटक टाकताना फक्त १३ धावा खर्च केल्या.
बांगलादेशकडून एकालाही झळकावता आली नाही फिफ्टी
पहिल्यांदा फलंदाजी करण्याची वेळ आल्यावर अब्रार (Zawad Abrar) आणि कलाम सिद्दीकी अलीन या जोडीनं बांगलादेशच्या डावाची सुरुवात केली. बांगलादेशच्या धावफलकावर अवघ्या १७ धावा लागल्या असाताना युधजित गुहा याने कलाम सिद्दीकीच्या रुपात भारतीय संघालं पहिलं यश मिळवून दिले. चेतन शर्मानं अब्रारच्या रुपात भारतीय संघाला आणखी एक विकेट मिळवून दिली. बांगलादेशचा कर्णधार अझीझुल हकिम तमिम याने फक्त १६ धावा करून तंबूचा रस्ता धरला. आघाडीचे फलंदाज स्वस्तात आटोपल्यावर मोहम्मद शीहब जेम्स याने ६७ चेंडूत ४० धावांची खेळी करत डाव सावरला. आयुष म्हात्रेनं त्याला तंबूचा रस्ता दाखवला. रिझान हुसेन याने बांगलादेशच्या संघाकडून सर्वाधिक ४७ धावांची खेळी केली. हार्दिक राजनं त्याला अर्धशतकाच्या उंबरठ्यावर बाद केले. याशिवाय विकेट किपर बॅटर फरिद हसन याने ३९ धावांचे योगदान दिले. त्यामुळे बांगलादेशच्या संघाला १९८ धावांपर्यंत मजल मारता आली.
बांगलादेशनं सेमीत टॉपर पाकला दिला होता दणका, भारताने श्रीलंकेला शह देत गाठलीये फायनल
आशिया कप स्पर्धेतील साखळी फेरीत 'अ' गटात दुसऱ्या स्थानावर राहून भारतीय संघानं फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. सेमी फायनलमध्ये भारतीय संघानं श्रीलंकेच्या संघाला एकतर्फी पराभूत केले होते. दुसरीकडे बांगलादेशच्या संघान 'अ' गटात टॉपर राहिलेल्या पाकिस्तानला दणका देत फायनल गाठली आहे.