लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : बीसीसीआयने महिला एकदिवसीय विश्वविजेत्या भारतीय संघाला ५१ कोटींचा रोख पुरस्कार जाहीर केला. सचिव देवजीत सैकिया यांनी ही माहिती दिली. पुरस्कार रकमेत खेळाडू, सहयोगी स्टाफ आणि राष्ट्रीय निवड समिती सदस्यांचा वाटा असेल. भारतीय संघाने रविवारी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी नमवून विश्वविजेतेपदाचा मान मिळविला होता. आयसीसीकडूनही भारतीय संघाला तब्बल ४० कोटी रुपयांचे रोख पारितोषिक मिळणार आहे. यासह भारतीय महिला क्रिकेट संघाने तब्बल ९१ कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे.
आधी धोनी, आता हरमन
२०११मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वात भारतीय पुरुष संघाने एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक जिंकल्यानंतर बीसीसीआयने भारताचे प्रवेशद्वार असलेल्या ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडियाच्या समोर मुंबईत फोटोशूट केले होते. त्याच पद्धतीचे शानदार फोटोशूट महिला विश्वविजेतेपदासाठी पुन्हा रंगले. रविवारी दक्षिण आफ्रिकेला नमवून दिमाखात विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर सोमवारी कर्णधार हरमनप्रीत कौरने ‘गेट वे ऑफ इंडिया’समोर विश्वचषकासह खास पोझ दिली.
'छोरियां'ची ही यशस्वी लढाई... तुम्हाला देतात ५ धडे...
- अपयश म्हणजे शेवट नाही : २०१७ मधील लॉर्ड्सवरची फायनल अजूनही आठवतेय ना? त्या वेदनादायी पराभवाने हरमनप्रीत, दीप्ती, स्मृती यांच्या मनात आग पेटवली होती. त्यांनी त्या अपयशाला शेवट मानले नाही.
- संकटावेळी डोकं शांत ठेवा : ४०व्या षटकानंतर सामना हातातून निसटत होता. सगळं संपल्यासारखं वाटत असतानाही हरमनप्रीत शांत होती. ती ओरडली नाही, तिने गोंधळ घातला नाही.
- तयारी आणि सातत्य : या स्पर्धेत प्रत्येक सामन्यात दीप्ती शर्माने कधी बॉलिंग, कधी बॅटिंग, तर कधी फील्डिंगमध्ये नवा ठसा उमटवला. त्यातून तिची तयारी दिसत होती, सातत्य दिसत होते. सातत्यानेच जग जिंकता येते, हे तिने दाखवून दिले.
- संघभावना : हा विजय ‘वन-वूमन शो’ नव्हता. ऋचा घोषने घेतलेला झेल, स्मृती मंधानाची भागीदारी, शेफालीची धडाकेबाज फलंदाजी अशा प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार हातभार लावला. जेव्हा ‘मी’ सोडून ‘आपण’ म्हणतो, तेव्हाच इतिहास घडतो.
- स्वप्नं पूर्णही करायची : शेवटच्या कॅचनंतर हरमनप्रीत कौरचे डोळे भरून आले होते. कारण हा फक्त एक विजय नव्हता, तर दहा वर्षांच्या सातत्याचा, घामाचा आणि अपार विश्वासाचा परिणाम होता. स्वप्न पूर्ण करण्यासाठी हीच जिद्द हवी असते.