Join us

IND vs AUS : टीम इंडियाचा विजयी धडाका, ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान सहज पार

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच्या तिरंगी मालिकेत भारतीय महिला क्रिकेट संघानं शनिवारी ऑस्ट्रेलिया संघावर 7 विकेट्स राखून विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 09:55 IST

Open in App

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच्या तिरंगी मालिकेत भारतीय महिला क्रिकेट संघानं शनिवारी ऑस्ट्रेलिया संघावर 7 विकेट्स राखून विजय मिळवला. स्मृती मानधानाची अर्धशतकी खेळी आणि शेफाली वर्माच्या 49 धावांच्या जोरावर टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान सहज पार केलं. या विजयासह भारतीय संघानं स्पर्धेतील आव्हान कायम राखले आहे. पण, त्यांना मालिकेतील अखेरच्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यावरही लक्ष ठेवावे लागेल. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं मोठ्या फरकानं विजय मिळवल्यात जेतेपदाच्या लढतीतून टीम इंडिया बाद होईल. 

ट्वेंटी-20 सामन्यांच्या तिरंगी मालिकेत पहिल्या तीन सामन्यांत केवळ एका विजयावर समाधान मानावे लागलेल्या भारतीय महिला संघासमोर आव्हान कायम राखण्याचं लक्ष्य होतं. इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाचा शनिवारी ऑस्ट्रेलियाशी सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं जोरदार फटकेबाजी केली. दिप्ती शर्मानं पहिल्याच षटकात ऑसींची सलामीवीर अ‍ॅलीसा हिलीला ( ०) माघारी पाठवले. त्यानंतर बेथ मूनी आणि अ‍ॅशलेघ गार्डनर यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. पण, हर्लीन देओलनं ही भागीदारी संपुष्टात आणताना मूनीला ( 16) बाद केले.

त्यानंतर गार्डनर आणि कर्णधार मेग लॅनींग यांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. लॅनींगनं 22 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीनं 37 धावा केल्या. दीप्ती शर्मानं तिला बाद केले. त्यानंतर गार्डनरने फटकेबाजी केली. तिनं 57 चेंडूंत 11 चौकार व 3 षटकारांसह 93 धावा चोपल्या. राधा यादवनं गार्डनरला शतकापासून वंचित ठेवले. ऑस्ट्रेलियानं 20 षटकांत 5  बाद 173 धावा केल्या. 

लक्ष्याचा पाठलाग करताना शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनीही सॉलिड सुरुवात करून दिली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली. एलिसा पेरीनं ही भागीदारी संपुष्टात आणली. शेफालीचे अर्धशतक अवघ्या एका धावेनं हुकलं. तिनं 28 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकार खेचून 49 धावा केल्या.  जेमिमा रॉड्रिग्जनं दुसऱ्या विकेटसाठी स्मृतीला दमदार साथ दिली. जेमिमानं कमी चेंडूंत मोठी खेळी साकारताना टीम इंडियावरील दडपण कमी केलं. पण, मीगन स्कटनं ही भागीदारी तोडली. जेमिमा 19 चेंडूंत 5 चौकारांसह 30 धावा करून माघारी परतली.

स्मृती आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. स्मृतीनं 44 चेंडूंत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. स्मृतीन आणि हरमनप्रीत या जोडीनं कमालीची फटकेबाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास पळवला. स्मृतीनं 48 चेंडूंत 7 चौकारांच्या मदतीनं 55 धावा केल्या. 19 व्या षटकात स्मृतीनं विकेट टाकली. पण, दीप्ती शर्मानं खणखणीत चौकार खेचून टीम इंडियावरील दडपण कमी केलं. टीम इंडियानं 7 विकेट्स राखून हा सामना जिंकला. 

महिलांच्या ट्वेंटी-20 क्रिकेटमधील हा तिसरा सर्वोत्तम धावांचा पाठलाग ठरला,

199 - इंग्लंड वि. भारत, 2018

179 - इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया, 2017

174 - भारत वि. ऑस्ट्रेलिया, 2020

 

टॅग्स :टी-20 क्रिकेटभारतीय महिला क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया