इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी 19 डिसेंबरला कोलकाता येथे लिलाव होणार आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स हा एकमेव संघ आहे की ज्यांनी कर्णधारपदी महेंद्रसिंग धोनीलाच कायम ठेवले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स हे संघ अनुक्रमे विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. 2013च्या आयपीएल मोसमानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबनं 11 कर्णधार बदलले आणि पुढील मोसमातही संघाची धुरा नव्या कर्णधाराकडे असेल. पण, आज आपण असे प्रसंग पाहणार आहोत की ज्यात हंगामाच्या मध्यंतरालाच कर्णधारांची उचलबांगडी झाली आहे.
राजस्थान रॉयल्सनं 2018च्या मोसमात अजिंक्य रहाणेकडे सत्राच्या मध्यंतराला संघाचे सूत्रे सोपवली होती. रहाणेच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स संघानं प्ले ऑफपर्यंत मजल मारली. पण, एलिमिनेटरमध्ये त्यांना कोलकाता नाइट रायडर्सकडून हार पत्करावी लागली. 2019च्या मोसमात रहाणेकडे नेतृत्व सोपवले. पण, संघाला पहिल्या आठ सामन्यांत दोनच विजय मिळवता आले आणि त्यानंतर रहाणेकडून हे कर्णधारपद काढून घेतले आणि स्टीव्ह स्मिथकडे ही जबाबदारी सोपवली. पुढील मोसमात रहाणे दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे.