IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसरा दिवस दक्षिण आफ्रिकेच्या संघाने गाजवला. दुसऱ्या दिवसाच्या खेळात पाहुण्या संघाने ४ विकेट्सच्या मोबदल्यात २४२ धावा करत पहिल्या डावात सर्व बाद ४८९ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाकडून यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुल जोडीनं कोणतीही जोखीम न घेता दुसऱ्या दिवसाअखेर संघाच्या धावफलकावर बिन बाद ९ धावा लावल्या. टीम इंडिया अजूनही ४८० धावांनी पिछाडीवर असून तिसरा दिवस हा सामन्याचा कल कुणाच्या बाजूनं झुकणार त्याचे चित्र स्पष्ट करणारा ठरले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बावुमाचा रेकॉर्ड अन् २०१० नंतरची ४०० पारची आकडेवारी दक्षिण आफ्रिकेसाठी जमेची बाजू
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत खेळलेल्या ११ कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघाने एकही सामना गमावलेला नाही. यातील १० सामन्यात संघ विजयी ठरला असून एक सामना अनिर्णित राहिला आहे. यात भर पडते ती ४०० पार धावसंख्येच्या आकड्याची. २०१० नंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या डावात ४०० धावा केल्यावर एकही सामना गमावलेला नाही. हा रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेसाठी जमेची बाजू असून टीम इंडियासाठी धोक्याची घंटा वाजल्याचे संकेत देणारा आहे.
IND vs SA : कोण आहे Senuran Muthusamy? कसोटी पदार्पणात 'विराट' विकेट; भारताशी खास कनेक्शन अन् बरंच काही
टीम इंडियासाठी आशेचा किरण
२०१० नंतर पहिल्या डावात ४०० धावा केल्यावर दक्षिण आफ्रिकेचा संघ अपराजित असल्याचा रेकॉर्ड असला तरी त्याआधी ३ वेळा दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या डावात ४०० धावा करून पराभवाचा सामना केला आहे. याउलट भारतीय संघाने आतापर्यंतच्या कसोटी इतिहासात ३ वेळा प्रतिस्पर्धी संघाने पहिल्या डावात ४५० पेक्षा अधिक धावा केल्यावर पलटवार करत कसोटी सामना जिंकला आहे. हा रेकॉर्ड टीम इंडियासाठी आशेचा किरण आहे.
टीम इंडियाने दोन वेळा ऑस्ट्रेलिया तर एकदा इंग्लंडला दिलीये मात
२००३ मध्ये अॅडलेड कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ५५६ धावा केल्यावर भारतीय संघाने हा सामना ४ विकेट्स राखून जिंकला होता. २०१० मध्ये बंगळुरुच्या मैदानात ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात ४७८ धावा केल्यावरही भारतीय संघाने कसोटी जिंकून दाखवली होती. २०१६ मध्ये चेन्नईच्या मैदानात इंग्लंडने पहिल्या डावात ४७७ धावा केल्या होत्या. त्यावेळीही भारतीय संघाने विजयाची नोंद केली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी टीम इंडियाला या कामगिरी पुनरावृत्ती करावी लागेल.