India Women vs Sri Lanka Women Final Smriti Mandhana : श्रीलंकेच्या यजमानपदाखाली सुरु असलेल्या तिरंगी वनडे मालिकेतील फायनल सामन्यात भारताची सलामीवर स्मृती मानधना हिने अर्धशतक झळकावले आहे. कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात फायनल सामना रंगला आहे. या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफे जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर प्रतिका रावल आणि स्मृती मानधना या जोडी संघाच्या डावाची सुरुवात केली. प्रतिका रावल ४९ चेंडूत ३० धावांची खेळी करून बाद झाली. तिने स्मृतीच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी ७० धावांची दमदार भागीदारी रचली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
स्मृती मानधनाचे सलग दुसरे अर्धशतक
श्रीलंकेतील तिरंगी वनडे मालिकेत स्मृतीच्या भात्यातून आलेले हे सलग दुसरे अर्धशतक आहे. याधी राउंड रॉबिन पद्धतीने खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेतील साखळी फेरीतील दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात स्मृती मानधना हिने ६३ चेंडूत अर्धशतक झळकावल्याचे पाहायला मिळाले होते.
तिरंगी वनडे मालिकेतील स्मृती मानधनाची कामगिरी
श्रीलंकेत सुरु असलेल्या तिरंगी वनडे मालिकेतील यजमान श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात स्मृती मानधना हिने ४६ चेंडूत ४३ धावांची खेळी केली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात तिच्या भात्यातून ५४ चेंडूत ३६ धावांची खेळी आली होती. या वनडे मालिकेतील श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात तिने १८ चेंडूत २८ धावांची खेळी केली होती. फायनलआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तिचे या स्पर्धेतील पहिले अर्धशतक आले. या सामन्यात तिने ६३ चेंडूत ५१ धावांची खेळी केली होती.