Join us

World Record! ४ शतकं, ६४६ धावा; भारताने शेवटच्या क्षणाला दक्षिण आफ्रिकेच्या हातातून खेचला विजय

INDW vs SAW : भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघातील दुसरी वन डे मॅच कमालीची चुरशीची झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 21:02 IST

Open in App

INDW vs SAW : भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघातील दुसरी वन डे मॅच कमालीची चुरशीची झाली. भारतीय महिलांनी उभ्या केलेल्या ३२५ धावांचा आफ्रिकेकडून यशस्वी पाठलाग होताना दिसला. पण, २०व्या षटकात पूजा वस्त्राकरने दोन विकेट घेऊन गमावलेली मॅच खेचून आणली. या सामन्यात स्मृती मानधना ( १३६), हरमनप्रीत कौर ( १०३*), मॅरिझाने कॅप ( ११४) आणि लॉरा वोल्व्हार्ड्ट ( १०३*) यांनी शतक झळकावले. महिला वन डे सामन्यात प्रथमच चार फलंदाजांनी शतक झळकावण्याचा पराक्रम केला गेला. यापूर्वी २०१८ मध्ये इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका लढतीत तीन शतकं झळकावली गेली होती. दक्षिण आफ्रिकेने आज भारताविरुद्धचा सामना अवघ्या ४ धावांनी गमावला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. 

दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. शफाली वर्मा ( २०) आणि दयालन हेमलथा ( २४) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. मात्र, स्मृती मानधना व कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी टीम इंडियाच्या डावाला आकार देताना तिसऱ्या विकेटसाठी १७१ धावांची भागीदारी केली.  स्मृतीने १२० चेंडूंत १८ चौकार व २ षटकारांसह १३६ धावा केल्या. हरमनप्रीतने ८८ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह नाबाद १०३ धावा केल्या आणि रिचा घोषने १३ चेंडूंत २५ धावांचे योगदान दिले. भारतीय महिलांनी ३ बाद ३२५ धावा केल्या.

प्रत्युत्तरात, तझमिस ब्रिट्स ( ५), आन्नेके बॉश ( १८) व सून ल्यूस ( १२) यांना माघारी पाठवून दक्षिण आफ्रिकेची अवस्था ३ बाद ६७ अशी झाली होती. पण, कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड्ट आणि अनुभवी मॅरिझाने कॅप यांनी चौथ्या विकेटसाठी १८४ धावांची भागीदारी करून सामना चुरशीचा बनवला. दीप्ती शर्माने ही भागीदारी तोडली. कॅप ९४ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह ११४ धावांवर माघारी परतली. पण, कर्णधार लॉरा मैदानावर उभी राहिली होती. शेवटच्या १२ चेंडूंत २३ धावांची गरज असताना १९व्या षटकात आफ्रिकेने १२ धावा मिळवल्या.  आफ्रिकेला ६ चेंडूंत १२ धावा करायच्या होत्या आणि हा सामना भारताच्या हातून निसटला असेच साऱ्यांना वाटत होते. पूजा वस्त्राकरकडे हे षटक दिले आणि पहिल्या चेंडूवर लॉराने एक धाव घेतली. नदीन डी क्लेर्कने दुसरा चेंडू चौकार खेचल्याने भारतीय चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. पण, पूजाने पुढील दोन चेंडूंत क्लेर्क ( २८) व नोंदूमिसो शँग्रास ( ०) यांना चूकीचे फटके मारण्यास भाग पाडले आणि विकेट मिळवल्या. २ चेंडूंत ६ धावा असा सामना अटीतटीचा आला आणि पूजाने केवळ १ धाव देत भारताचा ४ धावांनी रोमहर्षक विजय पक्का केला. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारतीय महिला क्रिकेट संघस्मृती मानधनाहरनमप्रीत कौर