Avesh Khan added to India’s squad for 2nd Test : भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर नेहमीच कमजोर दिसला आहे. यंदा देखील याचा प्रत्यय पाहायला मिळाला. दोन सामन्यांच्या मालिकेतील सलामीच्या सामन्यात भारताला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. निवड समितीने मोहम्मद शमीची रिप्लेसमेंट म्हणून आवेश खानची निवड केली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ३ ते ७ जानेवारी दरम्यान केपटाउन येथे दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.
भारतीय फलंदाजांच्या फ्लॉप शोमुळे टीम इंडियाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या डावात लोकेश राहुल (१०१) वगळता एकाही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. तर दुसऱ्या डावात विराट कोहलीने भारतीय चाहत्यांच्या आशा जिवंत ठेवताना (७६) धावा केल्या. पण, 'विराट' खेळी सुरू असताना दुसरीकडे भारताच्या एकाही खेळाडूला फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. यजमानांनी १६३ धावांची आघाडी घेतल्यावर भारतीय संघावर दबाव वाढला होता. विराट कोहलीने अखेरपर्यंत संघर्ष केला पण टीम इंडियाला एक डाव आणि ३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघ आपल्या दुसऱ्या डावात अवघ्या ३४.१ षटकांत १३१ धावांवर सर्वबाद झाला.
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, अभिमन्यू ईश्वरन, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आवेश खान, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.
दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर भारताची 'कसोटी'
एकूण कसोटी मालिका - ८
यजमान संघ - सातवेळा विजय
भारतीय संघ - एकदाही जिंकला नाही
अनिर्णित - १ मालिका
IND vs SA कसोटी मालिकांमधील आकडेवारी
एकूण कसोटी मालिका - १५
दक्षिण आफ्रिका - ८ विजय
भारतीय संघ - ४ विजय
अनिर्णित - ३ मालिका