कोलकाता - कसोटी विश्वविजेत्या दक्षिण आफ्रिकेच्या उत्कृष्ट फिरकी गोलंदाजीचे चक्रव्यूह भेदून यशस्वी वाटचाल करण्याच्या भारतीय स्टार फलंदाजांच्या कौशल्याची खरी परीक्षा शुक्रवारपासून ईडन गार्डनवर सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीदरम्यान असणार आहे. भारताला मागच्यावर्षी न्यूझीलंडने ३-० ने ‘क्लीन स्वीप’ दिला होता. त्यावेळी ऐजाज पटेल, मिचेल सँटनर आणि ग्लेन फिलिप्स या तीन फिरकीपटूंनी तब्बल ३६ बळी घेतले होते.
द. आफ्रिकेची भिस्त सध्या फिरकी गोलंदाजीवर आहे. अशावेळी यजमान फलंदाजांना फरकीपुढे कामगिरी सुधारावी लागणार आहे. द. आफ्रिकेची ओळख वेगवान गोलंदाजी आहे, पण सध्याचा संघ अव्वल फिरकीपटूंवर विसंबून आहे. पाकविरूद्ध त्यांनी मालिका १-१ अशी बरोबरीत राखली. त्यात केशव महाराज, सायमन हार्मर आणि सेनुरान मुथुस्वामी यांनी ३९ पैकी ३५ बळी घेतले. चारपैकी तीन फिरकी गोलंदाजांचा वापर होणार असल्याने या फिरकीचे कौशल्य विजयात मोलाचे ठरू शकेल.
भारतीय संघाचे सहायक प्रशिक्षक रेयॉन टेन डोएशे यांच्यानुसार, भारतीय खेळाडूंनी न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवातून धडा घेतला आहे. ३६ वर्षांच्या हार्मरने एक हजार प्रथमश्रेणी बळी घेतले असून, दहा वर्षांआधी हाशिम अमलाच्या नेतृत्वात त्याने मोहाली आणि नागपूरमधील दोन कसोटीत पुजारा, रिद्धिमान साहा आणि रोहित शर्मा यांना बाद केले होते. एका दशकानंतरही तो चाणाक्ष गोलंदाज म्हणून कायम आहे. रावळपिंडी कसोटीत ८ बळी घेत त्याने मालिका अनिर्णित राखण्यास मोलाची भूमिका बजावली. महाराज हा टिच्चून मारा करणाऱ्या फिरकीपटूंपैकी आहे. एकूणच हा सामना भारतीय फलंदाज वि. द. आफ्रिकेचे फिरकीपटू असा रंगणार आहे. दुसरी कसोटी २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळली जाईल.
‘टर्निंग विकेट’ नाही मिळणार!
भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक आणि कर्णधार शुभमन गिल यांनी वारंवार खेळपट्टी न्याहाळली. बंगाल क्रिकेट संघटनेचे (कॅब) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ही खेळपट्टी फिरकीस पोषक नसेल, असे आश्वस्त केले. जसप्रीत बुमराहला याचा फायदा होईल. भारत दोन वेगवान गोलंदाज खेळवू शकतो. बुमराह रिव्हर्स स्विंगमध्ये यशस्वी ठरेल. आकाश दीपला त्याचा जोडीदार म्हणून स्थान मिळू शकेल.
१५ वर्षांत ईडनवर वेगवान गोलंदाजांचे ६१ टक्के बळी आहेत. शुभमनच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडमध्ये मालिका
२-२ अशी बरोबरीत सोडविली. विंडीजला २-० असे नमवले. मात्र, भारताला या विजयामुळे ‘डब्ल्यूटीसी’त फारसा फायदा झालेला नाही.
...तर भारत ‘डब्ल्यूटीसी’त दुसऱ्या क्रमांकावर
विद्यमान ‘डब्ल्यूटीसी’ चॅम्पियन दक्षिण आफ्रिकेला २-० असे नमविल्यास भारत ‘डब्ल्यूटीसी’ गुणतालिकेत अव्वल दोन संघांमध्ये पोहोचणार आहे. सध्या भारत तिसऱ्या तर द. आफ्रिका पाचव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्या, तर श्रीलंका दुसऱ्या स्थानी आहे. दोन्ही संघांना अव्वल दोनमध्ये पोहोचण्याची संधी असून मालिका ०-२ अशी गमविणारा संघ पहिल्या पाच स्थानातून बाद होईल. भारत सहा वर्षांनी घरच्या मैदानावर आफ्रिकेविरुद्ध खेळत आहे.
‘फिरकीपटूंची मोलाची भूमिका’
कोलकाता : ‘स्थानिक खेळपट्ट्यांवर विजय मिळविण्यात फिरकी गोलंदाजांची भूमिका मोलाची ठरते. वेगवान माऱ्यासाठी जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज व आकाश दीप, तर फिरकीसाठी रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर व कुलदीप यादव हे पर्याय आहेत. अतिरिक्त वेगवान गोलंदाज की फिरकीपटू हे ठरविताना द्विधास्थिती असते. त्यामुळे परिस्थितीनुसार अंतिम संघ निवडू,’ असे भारताचा कर्णधार शुभमन गिलने म्हटले.
गिलने सांगितले की, ‘सामना फिरविण्यात फिरकीपटूंची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. ईडनची खेळपट्टी शुष्क असेल, तर वेगवान गोलंदाजांचा रिव्हर्स स्विंगही प्रभावी ठरेल. सर्व प्रकारांत दमदार कामगिरीसाठी शारीरिकपेक्षा मानसिक दृढता महत्त्वाची ठरते.’