Join us

India vs South Africa 1st Test: विराटने टॉस जिंकला, भारताची प्रथम फलंदाजी; पाहा Playing XI

भारतीय संघात अजिंक्य रहाणेला संधी; अय्यर, विहारी संघाबाहेरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 13:47 IST

Open in App

India vs South Africa 1st test Live Updates: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताबाहेर खेळताना धावा करण्यावर जोर असल्याचे सांगत त्याने फलंदाजीच्या निर्णयाचं समर्थन केलं. 'आऊट ऑफ फॉर्म' अजिंक्य रहाणेला संघात संधी मिळणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष होते. विराटने टॉसच्या वेळी या चर्चेवर पडदा टाकला. अजिंक्य रहाणेला आणखी एक सामन्यासाठी संधी देण्यात आली. परंतु श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी या दोघांना मात्र संघाबाहेरच ठेवण्यात आले. रविचंद्रन अश्विन आणि शार्दूल ठाकूर दोन्ही अष्टपैलू खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले असल्याने भारत पाच गोलंदाजांसह मैदानात उतरला आहे.

"परदेशात जेव्हा आम्ही कसोटी सामना खेळण्यासाठी जातो त्यावेळी प्रथम फलंदाजी करणं हे मानसिकदृष्ट्या आधार देणारं ठरतं. सेंच्युरियनच्या पिचवर खूप गवत असतं. दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर वेगवान गोलंदाजीला चालना मिळते. हे फारच आव्हानात्मक असते. त्यातच परदेशात आमच्या यशाची सुरूवात येथूनच झाली होती. त्यामुळे प्रथम फलंदाजी करत सकारात्मक विचारसरणीसह आम्ही खेळणार आहोत", असं विराट कोहलीने सांगितलं.

अजिंक्य रहाणेला आणखी एक संधी

भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याला संघातून बाहेर करणार अशी चर्चाही  सुरू होती. रहाणेला या कसोटी मालिकेसाठी उपकर्णधार पदावरून दूर करण्यात आले. त्यानंतर त्याला संघातही स्थान मिळणार नाही अशी चर्चा रंगली होती. पण अखेर आज संघ जाहीर झाला आणि त्याला संघात स्थान देण्यात आले. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी रहाणेला आणखी संधी दिली. पण गेल्या मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरला आणि परदेशात चांगली कामगिरी करणाऱ्या हनुमा विहारीला मात्र संघातून बाहेरच ठेवण्यात आले.

पहिल्या कसोटीसाठी भारताचा संघ - विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, शार्दूल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघराहुल द्रविड
Open in App