पुण्याच्या मैदानात टॉस गमावल्यामुळे पहिल्यांदा बॅटिंगसाठी उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या षटकात भारतीय संघानं तीन विकेट्स गमावल्या. इंग्लंडकडून मालिकेत पहिला सामना खेळणाऱ्या साकिब महमूद याने आपल्या पहिल्याच षटकात संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्या रुपात टीम इंडियाला धक्क्यावर धक्के दिले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर भारतीय संघाचा कॅप्टन सूर्य कुमार यादवलाही त्याने षटक संपवताना तंबूचा रस्ता दाखवला. पुण्याच्या मैदानात साकिब महमूद टाकलेल्या ट्रिपल मेडन ओव्हरमुळे टीम इंडियावर मोठी नामुष्की ओढावली. टी-२० क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय संघाने पहिल्या दोन षटकात आघाडीच्या तीन विकेट्स गमावल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्या ओव्हरमध्ये सलामी जोडीनं कुटल्या १२ धावा
संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या जोडींनं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. जोफ्रानं संजूला आखूड टप्प्याचा चेंडू टाकत चांगली सुरुवात केली. या मालिकेत संडू सॅमसन प्रत्येक वेळी अशाच चेंडूवर फसला आहे. पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेत संजूनं स्ट्राइक अभिषेक शर्माकडे दिले. दोन चेंडू निर्धाव खेळल्यावर अभिषेखच्या भात्यातून एक षटकार आणि चौकार आला. या षटकात भारतीय संघानं १२ धावा कुटल्या.
दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर पहिली विकेट, अखेरच्या चेंडूवर सूर्याही तंबूत
आक्रमक अंदाजात सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाच्या सलामीवीरांना रोखण्यासाठी इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलरनं नव्या भिडूवर डाव खेळला. त्याची ही चाल यशस्वीही ठरली. भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत पहिला सामना खेळणाऱ्या साकिब महमूदनं पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनला तंबूचा रस्ता दाखवला. सलग चौथ्या सामन्यात संजू सॅमसन आखूड टप्प्यावर टाकलेल्या चेंडूवर फसला. ३ चेंडूचा सामना करून तो एक धाव करून माघारी फिरला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या तिलक वर्माला साकिब महमूदनं खातेही उघडू दिले नाही. मग भारतीय कॅप्टन सूर्यकुमार यादव मैदानात उतरला. त्याने मेहमूदची हॅटट्रिक रोखली. पण अखेरच्या चेंडूवर त्याच्याही पदरी भोपळा पडला. १२ धावसंख्येवर दुसऱ्या षटकात भारतीय संघाने आघाडीच्या तीन विकेट्स गमावल्या. याआधी टीम इंडियाने दोन षटकात कधीच आघाडीच्या तीन विकेट्स गमावल्या नव्हत्या.