Join us

IND vs ENG : आधी अय्यरनं धुतलं; मग गिल-पटेल जोडी जमली! भारतीय संघानं दिमाखात मॅच जिंकली

भारतीय संघानं ४ विकेट्स राखून सामना जिंकत मालिकेत घेतली १-० अशी आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 20:49 IST

Open in App

श्रेयस अय्यरच्या भात्यातून निघालेली कडक अर्धशतकी खेळी अन् त्यानंतर उप कर्णधार शुबमन गिल आणि अक्षर पटेलनं केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर भारतीय संघानं पहिला एकदवीय सामना जिंकला आहे.  विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या नागपूरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत बटलरचा निर्णय चुकीचा ठरवला. हर्षित राणाचा भेदक मारा आणि रवींद्र जडेजाच्या फिरकीतील कमाल यामुळे  इंग्लंडचा संघ ४७.४ षटकातच २४८ धावांवर आटोपला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

भारतीय ंसघानं ४ विकेट्स राखून जिंकला सामना

इंग्लंडच्या संघानं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा या जोडीनं भारताच्या ड़ावाची सुरुवात केली. पहिला वनडे सामना खेळणारा यशस्वी जैस्वाल २२ चेंडूत १५ धावा करून तंबूत परतला. त्याच्या पाठोपाठ भारतीय कर्णधार रोहित शर्मानंही आपली विकेट फेकली.  त्याने ७ चेंडूत २ धावा केल्या. १९ धावांवर भारतीय संघाचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले होते. त्यानंतर अय्यर, शुबमन गिल आणि अक्षर पटेलच्या अर्धशतकाच्या मदतीने भारतीय संघाने विजयाला गवसणी घातली. भारतीय संघानं ४ विकेट्स राखून  सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली.

आधी गिल-अय्यर यांच्यात दमदार भागीदारी

सलामी जोडी स्वस्तात माघारी फिरल्यावर शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी संघाचा डाव सावरला. श्रेयस अय्यरनं ३६ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ५९ धावा करत इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले. तो फटकेबाजी करताना दुसऱ्या बाजूला शुबमन गिल एकदम संयमी खेळी करताना दिसला. अय्यर आणि गिल जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला.

मग शुबमन गिल अन् अक्षर पटेल जोडी जमली, शतकी भागीदारीसह इंग्लंडला ढकलले बॅकफूटवर

श्रेयस अय्यरनं विकेट गमावल्यावर भारतीय संघाने अक्षर पटेल याला बढती दिल्याचा सीन पाहायला मिळाला. या संधीच अष्टपैलू खेळाडूनं सोनंही करून दाखवलं. शुबमन गिल आणि अक्षर पटेल या दोघांनी शतकी भागीदारी रचली. अक्षर पटेल याने ४७ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५२ धावांचे योगदान दिले. शुबमन गिलनं ९२ चेंडूतील ८७ धावांच्या संयमी खेळीत १३ चौकार मारले. विजय दृष्टिक्षेपात असताना शुबमन गिल बाद झाला. शेवटी हार्दिक पांड्या आणि रवींद्र जड्डूनं संघाच्या विजयावर शिक्का मोर्तब केले. जड्डूनं बॅक टू बॅक चौकार मारत मॅच संपली.

टॅग्स :भारत विरूद्ध इंग्लंड २०२५श्रेयस अय्यरशुभमन गिलअक्षर पटेल