अॅडिलेडच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव १८० धावांत आटोपला आहे. ऑस्ट्रेलियन स्टार अन् पिंक बॉल टेस्टमधील किंग मिचेल स्टार्क याने ६ विकेट्स घेत टीम इंडियाला अडचणीत आणले. एका बाजूनं ठराविक अंतराने विकेट्स पडत असताना ऑल राउंडर नितीश रेड्डीनं पुन्हा एकदा कमालीची आणि उपयुक्त अशी ४२ धावांची खेळी करत संघाला मोठा दिलासा दिला. त्याच्या खेळीच्या जोरावरच भारतीय संघाला पहिल्या डावात १८० धावांपर्यंत मजल मारता आली.
पिंक बॉलचा राजा स्टार्कनं मारला 'सिक्सर'
पर्थ कसोटी सामन्यात मिचेल स्टार्कला आपली छाप सोडता आली नव्हती. पण गुलाबी चेंडूवर सर्वोत्तम मारा करण्यात माहिर असलेल्या स्टार्कनं दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्याच चेंडूवर यशस्वी जैस्वालची विकेट घेत टीम इंडियाला टेन्शनमध्ये टाकले. तो इथंच थांबला नाही. केएल राहुल आणि विराट कोहलीलाही त्याने आपल्या जाळ्यात अडकवले. अश्विन आणि हर्षित राणा यांची विकेट्स घेत त्याने कसोटी कारिकिर्दीत १६ व्या वेळी ५ विकेट्स हॉलचा पराक्रम नोंदवला. पिंक बॉल टॅस्टमध्ये चौथ्यांदा त्यांनी अशी कामगिरी करून दाखवली आहे. स्टार्कच्या ६ विकेट्स शिवाय पॅट कमिन्स आणि बोलंड यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.
पिंक बॉलचा किंग आहे स्टार्क, इथं पाहा त्याची डे नाईट कसोटीतील आकडेवारी
पिंक बॉल कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मिचेल स्टार्क टॉपला आहे. टीम इंडियाविरुद्धच्या अॅडिलेड कसोटी सामन्याआधी २३ कसोटी सामन्यात त्याच्या खात्यात ६६ विकेट्सची नोंद होती. टीम इंडियाच्या पहिल्या डावात ६ विकेट्स आपल्या खात्यात जमा करत त्याने आपलं अव्वलस्थान आणखी भक्कम केले आहे. पिंक बॉल टेस्टमध्ये त्याच्या खात्यात आता ७२ विकेट्स जमा आहेत. ही आकडेवारी पिंक बॉल टेस्टमध्ये तो किंग असल्याचे दर्शविते.
नितीश रेड्डीची आणखी एक उपयुक्त खेळी
टीम इंडियाकडून नितीश रेड्डीनं ५४ चेंडूत सर्वाधिक ४२ धावा केल्या. त्याच्याशिवाय आर अश्विन २२ (२२), रिषभ पंत २१ (३५), शुबमन गिल ३१ (५१) आणि लोकेश राहुल ३७(६४) या खेळाडूंशिवाय अन्य कुणालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. नितीश रेड्डीनं आपल्या छोट्याखानी खेळीत ३ चौकार आणि ३ षटकार मारत संघाची धावसंख्या १८० धावांपर्यंत पोहचवली.