१९ वर्षाखालील आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आहे. पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला ४४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना पाकिस्तानच्या संघाने सलामीवीर उस्मान खान ६० (९४) आणि शाहझैब खान १५९ (१४७) या दोघांच्या दमदार खेळीच्या जोरावर निर्धारित ५० षटकात ७ बाद २८१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ ४७.१ षटकात २३७ धावांत आटोपला.
युवीची कार्बन कॉपी; निखिलची बॅट तळपली, पण...
धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या आघाडीतील चारही फलंदाज अपयशी ठरले. त्यामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या. संघ अडचणीत असताना डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणाऱ्या निखिल कुमारनं भारतीय संघाचा डाव सावरला. जोपर्यंत तो मैदानात होता तोपर्यंत सामान भारतीय संघ सहज जिंकेल असे वाटत होते. पण ६७ धावांवर तो यष्टिचित झाला. त्याने आपल्या दमदार अर्धशतकी खेळीत ६ चौकार आणि २ उत्तुंग षटकार मारले. त्याचा तोरा, बॅटिंग करण्याची शैली पाहून अनेकांना युवराज सिंगची आठवण आली. तो युवीची कार्बन कॉपी वाटतो अशा काही पोस्टही पाहायला मिळाल्या. पण शेवटी त्याची ही खेळी व्यर्थच ठरली.
तळाच्या फलंदाजीत मोहम्मद एनानची फटकेबाजी, लक्षवेधी वैभवचा फ्लॉप शो
निखिल बाद झाल्यावर तळाच्या फलंदाजीतील मोहम्मद एनान याने जीव ओतून सामना फिरवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे प्रयत्नही कमीच पडले. २२ चेंडूत ३० धावांवर तो रन आउट झाला अन् भारतीय संघाचा डाव आटोपला. भारतीय संघाकडून आशिया कप स्पर्धेसाठी मैदानात उतरलेल्या १३ वर्षीय वैभव सूर्यंवंशी याच्यावर सर्वांच्या नजरा होत्या. आयपीएलमध्ये कोट्यवधींची बोली लागलेला हा खेळाडू पाकिस्तान विरुद्धच्या लढतीत सपशेल अपयशी ठरला. ९ चेंडूंचा सामना करून तो एका धावेवर बाद झाला.
पाकिस्तानशिवाय हे दोन संघ भारताच्या गटात
१९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेत भारतीय संघ 'अ' गटात असून साखळी फेरीत भारत जपान आणि युएई संघाविरुद्ध खेळणार आहे. उर्वरित दोन्ही सामने जिंकून स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल.