Join us

Team India for Asia Cup 2022: मराठमोळ्या ऋतुराजसह अनेकांचा 'स्वप्नभंग'! पाहा कोण-कोण संधीला मुकलं...

शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराजही संघातून बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 22:41 IST

Open in App

Team India Squad for Asia Cup 2022: संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे असेल. स्टार फलंदाज केएल राहुलचे १५ सदस्यीय संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे राहुल बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे पण अखेर आता तो संघात परतला आहे. असे असले तरी, संघ जाहीर झाल्यानंतर Asia Cup  सारख्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याचे अनेक युवा खेळाडूंचे स्वप्न भंगले.

या खेळाडूंचे स्वप्न भंगले!

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघात युवा फलंदाज इशान किशन, व्यंकटेश अय्यर, यष्टिरक्षक संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड यांना स्थान मिळालेले नाही. याशिवाय अष्टपैलू शार्दुल ठाकूर, फिरकी गोलंदाज कुलदीप यादव, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, उमरान मलिक यांनाही संघात समाविष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे आजच्या संघाच्या घोषणेनंतर अनेक खेळाडूंचे मोठ्या स्पर्धेत भारताकडून खेळण्याचे स्वप्न भंगल्याचे दिसत आहे.

दोन मुख्य गोलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर

वेगवान गोलंदाज हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराह दुखापतींमुळे आशिया चषकासाठी संघात स्थान मिळवू शकले नाहीत. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीमुळे निवडीसाठी उपलब्ध नव्हते, असे बीसीसीआयने म्हटले आहे. ते सध्या बंगळुरू येथील NCA मध्ये आहे. या स्पर्धेसाठी संघात तीन गोलंदाजांचा समावेश करण्यात आला असून त्यात भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांचा समावेश आहे.

आशिया कपसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर जडेजा, आर अश्विन, वाय चहल, आर बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान | स्टँड बाय खेळाडू- श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चहर

२७ ऑगस्टपासून दुबईत आशिया कपला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत ६ संघ खेळणार आहेत. भारतीय संघ २८ ऑगस्टला पाकिस्तान विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया अ गटात आहे.

टॅग्स :एशिया कपभारतीय क्रिकेट संघऋतुराज गायकवाडशार्दुल ठाकूर
Open in App