India U19 vs Japan U19, 8th Match Final Result : शारजाह क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या जपान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने २११ धावांनी मोठा विजय मिळवला आहे. नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना कर्णधार मोहम्मद अमान याने केलेली शतकी खेळीसह आयुष म्हात्रे आणि केपी कार्थिकेया यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकात ६ बाद ३३९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना जपानचा संघ ८ बाद १२८ धावांपर्यंतच पोहचू शकला.
कॅप्टन मोहम्मद अमान याची नाबाद सेंच्युरी
भारतीय संघाचा कर्णधार मोहम्मद अमान याने ११८ चेंडूत १२२ धावांची दमदार खेळी केली. तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. १९ वर्षाखालील आशिया कप स्पर्धेत भारताकडून शतकी खेळी करणारा मोहम्मद अमान हा ११ वा फलंदाज ठरला.
आयुष म्हात्रेची कडक फिफ्टी
भारतीय डावाची सुरुवात करताना आयुष म्हात्रेनं आक्रमक अंदाजात डावाची सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला वैभव सूर्यवंशीही त्याला साथ देताना दिसून आले. पहिल्या विकेटसाठी सलामी जोडीनं ४४ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. आयुष म्हात्रेनं २९ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ५४ धावांची कडक खेळी केली.
केपी कार्थिकिया यानेही कॅप्टनला उत्तम साथ दिली. त्याने ४९ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या शिवाय वैभव सूर्यवंशी २३ (२३), आंद्रे सिद्धार्थ ३५ (४८), निखिल कुमार १२ (१७) आणि हार्दिक राजनं अखेरच्या षटकात तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करताना १२ चेंडूत २५ धावा ठोकल्या. भारतीय संघाने निर्धारित ५० षटकात ६ बाद ३३९ धावा करत जपानसमोर ३४० धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना जपानच्या संघाला ५० षटकांत ८ बाद १२८ धावांपर्यंतच मजल मारता आली. गोलंदाजीत भारताकडून गोलंदाजीत चेतन शर्मा, हार्दिक राज आणि केपी कार्तिकेया यांनी प्रत्येकी - विकेट्स घेतल्या. याशिवाय युधजितगुहाला एक विकेट मिळाली. जपानच्या संघाने एक विकेट रन आउटच्या रुपात गमावल्याचे पाहायला मिळाले.
भारतीय संघासाठी कसं असेल सेमीचं समीकरण
आता युवा टीम इंडिया 'अ' गटातील साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना युएई विरुद्ध खेळताना दिसेल. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघानं मोठ्या फरकानं विजय मिळवला असला तरी गुणतालिकेत भारतीय संघ पाकिस्तान, युएई यांच्यानंतर तिसऱ्या स्थानावर आहे. या गटात जपानच्या संघाने दोन्ही सामने गमावले असल्यामुळे ते स्पर्धेतून आउट झाले आहेत. दुसरीकडे पाकिस्तानच्या संघाने दोन्ही सामने जिंकून सेमीतील आपलं स्थान पक्कं केले आहे. भारतीय संघाने युएईला नमवलं की, त्यांचा सेमीचा मार्ग मोकळा होईल. भारत-युएई यांच्यातील सामना बुधवारी खेळवण्यात येणार आहे.