राहुल द्रविडनंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारलेल्या गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली असली तरी, कसोटी क्रिकेटमध्ये संघाची कामगिरी सातत्याने खालावत आहे. गंभीर यांच्या कार्यकाळात भारतीय संघाच्या नावावर अनेक लाजिरवाणे विक्रमांची नोंद झाली असून कसोटी क्रिकेटमधील भारताच्या वर्चस्वावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
१) १२ वर्षांनंतर मायदेशी न्यूझीलंडविरुद्ध पराभव
पुण्यात न्यूझीलंडविरुद्ध पराभूत होणे हा १२ वर्षांनंतर भारताचा मायदेशातील पहिलाच कसोटी पराभव होता. त्यानंतर बेंगळुरू आणि मुंबईतील पराभवांमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. १९५५ नंतर पहिल्यांदाच न्यूझीलंडने भारतात कसोटी मालिका जिंकली. तर, भारताला २४ वर्षांनंतर पहिल्यांदाच घरच्या मैदानावर ३-० असा पराभव स्वीकारावा लागला.
२) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमावली, १० वर्षांचे वर्चस्व संपुष्टात
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने ३-१ अशी मालिका गमावली. यामुळे या प्रतिष्ठेच्या मालिकेत भारताचे १० वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आले. गंभीर यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने या हंगामात खेळलेल्या दहापैकी सहा कसोटी गमावल्या. ही भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप इतिहासातील सर्वात वाईट मालिका मानली जाते.
३) डब्लूटीसीच्या शर्यतीतून बाहेर
डब्लूटीसीच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात ०-३ असा पराभव आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध परदेशात १-३ असा पराभव झाल्याने भारताच्या क्रमवारीत गंभीर घसरण झाली. यापूर्वी भारताने सलग दोन डब्लूटीसी फायनल खेळल्या होत्या.
४) द.आफ्रिकेविरुद्ध १२४ धावांचे लक्ष्य गाठण्यास अपयशी
सोपा पाठलाग करण्यात अपयश: कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १२४ धावांचे साधे लक्ष्यही भारतीय संघ गाठू शकला नाही आणि ३० धावांनी पराभूत झाला. गेल्या १५ वर्षांत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा हा पहिलाच घरच्या मैदानावरचा पराभव होता. भारतीय संघ २१ व्या शतकात १५० पेक्षा कमी लक्ष्याचा पाठलाग करताना दोनदा पराभव पत्करणारा एकमेव संघ बनला आहे.
५) घरच्या मैदानावरची अजिंक्यता धोक्यात
गंभीर यांच्या प्रशिक्षणाखाली भारताने घरच्या मैदानावर आठ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी चार गमावले आहेत. एकेकाळी ‘अजिंक्य’ मानली जाणारी टीम इंडिया आता मायदेशातही सलग पराभव स्वीकारत असल्याने त्यांच्या कसोटी क्रिकेटमधील वर्चस्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.