IND vs SA ODI Series Gautam Gambhirs Record As India Cricket Team Head Coach : कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ आता पाहुण्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतून भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन स्टार पुन्हा मैदानात उतरणार आहेत. या दोघांच्या कामगिरीशिवाय पुन्हा एकदा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरही केंद्रस्थानी असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टी-२०त दबदबा, पण कसोटीसह वनडेतील कामगिरी निराशजनक
२०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर राहुल द्रविडच्या जागी भारतीय मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची वर्णी लागली. गंभीरच्या पर्वात भारतीय संघाने टी-२०मध्ये आपला दबदबा कायम राखला. पण कसोटीत टीम इंडियाची अवस्था खूपच बिकट झाल्याचे पाहायला मिळाले. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली वनडेचा रेकॉर्ड बरा असला तरी मोजक्या द्विपक्षीय मालिकेत टीम इंडियाची पाटी कोरीच आहे. इथं एक नजर टाकुयात गंभीरच्या मार्गदर्शनाखाली एकंदरीत वनडेसह द्विपक्षीय मालिकेत भारतीय संघाची कामगिरी कशी राहिली आहे त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
Virat Kohli: कोहली विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर; शतक ठोकताच बनेल क्रिकेटचा हुकमी 'ऐक्का'!
वनडेतील विनिंग पर्सेंटेज ६४.२८ च्या घरात, पण...
गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त झाल्यापासून भारतीय संघाने आतापर्यंत १४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात ९ विजय आणि ४ पराभवासह एक सामना बरोबरीत सुटला आहे. गंभीरच्या मार्गदर्शनाखालील वनडेतील टीम इंडियाचे विनिंग पर्सेंटेज ६४.२८ असे आहे. पण यात ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सलग ८ विजयाची कामगिरी वगळली तर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियन मैदानातील द्विपक्षीय मालिका भारतीय संघाने गमावल्याचे पाहायला मिळाले. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाला २-० अशा पराभवाचा सामना करावा लागला होता. याशिवाय ऑस्ट्रेलियन मैदानातील मालिका टीम इंडियाने २-१ अशी गमावली होती. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील कामगिरी सर्वोच्च होती. पण तत्कालीन कर्णधार रोहित शर्मानं या विजयाचं श्रेय द्रविडला दिल्याचे पाहायला मिळाले होते.
गंभीरसाठी महत्त्वपूर्ण असेल दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
गंभीरनं प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून भारतीय संघ पहिल्यांदाच घरच्या मैदानात वनडे मालिका खेळणार आहे. याआधी दोन वनडे मालिकेतील पराभवानंतर गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ पहिली द्विपक्षीय मालिका जिंकणार का? ते पाहण्याजोगे असेल.
टी-२० त नंबर वन, पण कसोटीत नापास !
गंभीरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २२ पैकी २० टी-२० सामने जिंकले आहेत. छोट्या फॉरमॅटमधील टीम इंडियाचे विनिंग पर्संटेज ९०.९० असे आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाने एकही मालिका गमावलेली नाही. टीम इंडियाने टी-२० क्रिकेटमध्ये आपला विजयी सिलसिला कायम ठेवला. पण कसोटीत मात्र परिस्थिती खूपच बिकट झाली. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेसह गतवर्षी न्यूझीलंडच्या संघाने घरच्या मैदानात ३-० असा दिलेला पराभवाचा धक्का हा गंभीरच्या कोचिंग कारकिर्दीवर मोठा डाग लावणारा होता. कसोटीत १९ सामन्यापैकी ७ विजय, १० पराभव आणि २ अनिर्णित सामन्यासह भारताचे विनिंग पर्सेंटेज ३६.८४ इतके आहे.