Indian Cricket Team Test Downfall Analysis : भारतीय क्रिकेटमध्ये स्टार क्रिकेटर घडण्याची अखंडीत मालिका पाहायला मिळाली आहे. कधी काळी भारतीय संघाची मॅच टीव्हीवर दाखवा, यासाठी पैसे मोजणाऱ्या बीसीसीआयकडे आज एवढा पैसा आला आहे की, तो मोजायला माणसं कमी पडतील. हे सगळं फक्त अन् फक्त एकामागून एक समोर आलेल्या स्टार क्रिकेटर्समुळे घडलेले नाही. तर यात क्रिकेटचं वेड जपणाऱ्या बाराव्या खेळाडूचा म्हणजेच प्रेक्षकांचा मोठा वाटा आहे. त्या चाहत्यांनी ज्यांना डोक्यावर घेतलं त्यांना संपवण्याचा घाट गौतम गंभीरनं घातला अन् तो डाव आता त्याच्या अंगलट आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. इथं जाणून घेऊयात 'स्टार्स'वर 'गंभीर' वार अन् कसोटीत टीम इंडियाचे 'अच्छे दिन' गायब होण्यामागच्या फसलेल्या स्क्रीप्टसंदर्भातील सविस्तर स्टोरी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
घरच्या मैदानात टीम इंडियाचा खंबीरपणा ढळून पडला; बाराव्या खेळाडूलाही 'गंभीर' प्रश्न कळला!
कोणतीही संस्था एखाद्या कर्मचाऱ्याला कधी मोठं होऊ देत नाही. BCCI ही त्याला अपवाद नाही. मर्जीतल्या खेळाडूला मान सन्मान आणि जो डोळ्यात खुपतो त्याचा अपमान हा खेळही अनेक दिवसांपासून चालत आला आहे. पण यावेळी मात्र कहर झाला. WTC च्या नव्या चक्रात नव्या संघ बांधणीचा डाव खेळताना जुन्या आणि अनुभवी खेळाडूंना संघाबाहेर ठेवण्याचा डाव शिजला. बायका पोरं मॅचला आणू नका, राष्ट्रीय संघात खेळायचं तर देशांतर्गत क्रिकेट खेळा, अशी नियमावली काढली गेली. पण जे देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत, त्यांना संघात घ्यायचा पत्ताच नाही, पण या खेळात रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी खेळाडूंचा पत्ता मात्र कट झाला. एकाच्या मनमानी कारभाराचा फटका संघाला बसेल, याचा विचारही झाला नाही. शेवटी जे घडायचं ते घडलं. घरच्या मैदानात टीम इंडियाचा खंबीरपणा ढळून पडला. या सगळ्या गोष्टीला टीम इंडियाचा नावाप्रमाणे नेहमी गंभीर असणारा चेहराच कारणीभूत आहे हे बाराव्या खेळाडूलाही कळलंय. त्यामुळे गुवाहाटीच्या मैदानात त्याच्याविरोधात नारेबाजी झाल्याचे पाहायला मिळाले. क्रिकेटच्या मैदानात खेळाडूंना चाहत्यांच्या टीकेचा सामना करावा लागला आहे. पण गंभीर हा पहिला कोच ठरला ज्याने चाहत्यांचा रोष ओढावून घेतल्याचे पाहायला मिळाले.
गौतम गंभीरची कोच पदावरून हकालपट्टी होणार? लाजिरवाण्या पराभवानंतर BCCIने आखला नवीन 'प्लॅन'
रोहित-विराटला संघाबाहेर काढून टीम इंडिया चक्रव्यूव्हात फसली!
भारतीय संघाने WTC स्पर्धेतील पहिल्या दोन हंगामात फायनल गाठली. पण एकदा विराट कोहली आणि त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया फायनल बाजी मारण्यात कमी पडली. गतवर्षी ब्लॅक कॅप्स न्यूझीलंडच्या संघाने 'व्हाइटवॉश' केल्यामुळे तिसऱ्या हंगामातील फायनल खेळण्याच्या स्वप्नाला सुरुंग लागला. आता या पराभवाच्या वेळी रोहित-विराट भारतीय संघाचा भाग होते. WTC च्या चौथ्या चक्राआधी वेगळीच चक्रे फिरली. रोहित पाठोपाठ विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि शुभमन गिल संघाचा नवा कर्णधार झाला. WTC च्या नव्या चक्रात इंग्लंडच्या मैदानातून गंभीर-गिल पर्वासह टीम इंडियाने नवी सुरुवात केली. इथं आपण मालिका २-२ बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. खरंतर हे यश खूप फगवून सांगण्यात आले. इंग्लंडमधील यावेळीची खेळपट्टी फॉरेन कंडिशनचं फिल देणारी नव्हतीच. बॅझबॉलच्या नादात इंग्लंडनं पाटा खेळपट्टीवर आपला पाहुणचार केला. त्यात खंडीभर शतक आल्यामुळे आपण हारकून पाणी झालो. दुबळ्या वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका जिंकल्यावर छाती आणखी फुगली. पण दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २५ वर्षांनी पुन्हा एकदा घरच्या मैदानावर लख्तरे काढत टीम इंडियाचा फुगा फोडला. रोहित-विराटला संघाबाहेर काढण्याचा जो डाव खेळला गेला त्यामुळे भारतीय कसोटी संघ चक्रव्युव्हात फसल्याचे चित्र अगदी स्पष्ट दिसू लागले आहे.
संक्रमण की आक्रमण? भारतीय कसोटीची वाट कुणामुळं लागली?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मैदानातील लाजिरवाण्या पराभवानंतर कोच गौतम गंभीर यांनी नव्या टीम इंडियाला वेळ देण्याची गरज आहे, असे म्हटले. एवढेच नाही टीम इंडियाच्या संक्रमणाबद्दल बोलताना, भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये बॅटिंग आणि बॉलिंग ऑर्डरमध्ये एकाच वेळी मोठा बदल कधीच झालेला नाही, ही गोष्टीही गंभीरनं बोलून दाखवली. हे अगदी बरोबर आहे. पण हा घाट घातला कुणी? रोहितला संघाबाहेर करुन गिलकडे जबाबदारी देण्याची ही घाई करण्याची खरंच गरज होती का? तू कसोटीतून निघण्याआधी नेतृत्वाचा चेहरा तयार करून जा, हा टास्क त्याला देता आला नसता का? कोहलीची उपस्थितीत बॅटिंग ऑर्डरसोबत टीम इंडियाची ऊर्जा बूस्ट करेल, हा विचार का नाही केला? असे अनेक प्रश्न भारतीय संघाच्या कसोटीतील पडझडीनंतर निर्माण होतात. संक्रमणाच्या नावाखाली स्टार्स खेळाडूंवर केलेला वार गौतम गंभीरसह टीम इंडियाच्या अंगलट आल्याचे दिसते. त्यात संक्रमणाच्या काळात टी-२० प्लेयर घेऊन टेस्टमध्ये बेस्ट होण्याची रणनिती आणि ऑलराउंडर्सला सुपर स्टार बनवण्याच्या नादात त्याने भारतीय कसोटी संघाची वाट लावलीये का? हा प्रश्नही निर्माण झाला आहे.