भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेली दोन सामन्यांची कसोटी मालिका एका वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हती. घरच्या मैदानावर भारताला या मालिकेत २-० असा पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे भारतीय क्रिकेटला मोठा धक्का बसला आहे. गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारताचा ४०८ धावांनी झालेला पराभव हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला. या दारुण पराभवानंतर केवळ चाहतेच नव्हे, तर माजी क्रिकेटपटूंनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, भारताचा माजी यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली.
कार्तिक म्हणाला की, "परदेशी संघ भारतात कसोटी सामने खेळायला घाबरत होते, तो काळ आता संपला आहे. परदेशी संघ आता भारतात येण्यास उत्सुक असतील. १२ महिन्यांतील हा दुसरा व्हाईटवॉश आहे आणि गेल्या तीन घरच्या कसोटी मालिकांमधील दुसरा क्लिन स्वीप आहे. भारतीय कसोटी क्रिकेटसाठी हे एक मोठे संकट आहे." कार्तिकने टीम इंडियाच्या संघ निवड आणि संयोजनावरही बोट ठेवले. भारताने या मालिकेत खूप जास्त अष्टपैलू खेळाडू खेळवल्यामुळे संघाचे संतुलन बिघडल्याचे त्यांनी सांगितले. त्याने नितीश रेड्डी यांचे उदाहरण दिले, ज्याने घरगुती हंगामात फक्त १४ षटके टाकली होती, तरीही त्याला कसोटीत वेगवान गोलंदाजाची भूमिका देण्यात आली.
"या मालिकेत फक्त दोन भारतीय खेळाडूंनी अर्धशतके झळकावली. तर, दक्षिण आफ्रिकेच्या सात खेळाडूंनी अर्धशतके झळकावली. यावरून आपण किती मागे आहोत हे दिसून येते. तसेच तिसऱ्या क्रमांकावर योग्य फलंदाजाची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण आता कोणीही तिसर्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो. कधी सुदर्शन नंबर ३ वर खेळतो, तर कधी वॉशिंग्टन सुंदर. प्रत्येक सामन्यात बदल करत राहिल्याने स्थिरता कशी येईल?" असाही प्रश्न कार्तिकने उपस्थित केला.