Dhuruv Jurel Scored Hundred In Both Innings For India A : भारतीय संघातील युवा विकेट किपर बॅटर ध्रुव जुरेल सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये दिसतोय. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात कसोटी कारकिर्दीतील पहिलं शतक झळकवणाऱ्या या पठ्ठ्यानं दक्षिण आफ्रिका 'अ' विरुद्धच्या सामन्यात भारत 'अ' संघाकडून सलग दुसरी सेंच्युरी ठोकली आहे. भारत 'अ' विरुद्ध दक्षिण आफ्रिका 'अ' यांच्यातील दुसरा अनौपचारिक कसोटी सामना बंगळुरु स्थित बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलेन्सच्या ग्राउंडवर खेळवण्यात येत आहे. पहिल्या डावात १३२ धावांची नाबाद खेळी करणाऱ्या ध्रुव जुरेल याने दुसऱ्या डावात १२७ धावांची नाबाद खेळी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गिल-गंभीर जोडीला टेन्शन देणारा डाव
युवा विकेट किपर बॅटरची ही कामगिरी आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमधील दावेदारी भक्कम करणारी अशीच आहे. त्याच्या धडाकेबाज कामगिरीमुळे पंतचं कमबॅक झाले असताना त्याच्यासाठी संघात जागा कशी करायची? हा मोठा तिढा आता भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांना सोडवावा लागणार आहे.
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
हर्ष दुबेच्या साथीनं शतकी भागीदारी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात त्याच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात २५५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात २२१ धावांवर आटोपला. ३६ धावांच्या अल्प आघाडीसह भारतीय संघाने दुसऱ्या डावाची सुरुवात केली. या डावात कर्णधार रिषभ पंतनं अर्धशतक झळकावले. पण पुन्हा एकदा टीम इंडियाकडून ध्रुव जुरेलच्या बॅटमधून सर्वोच्च खेळी आली.
सलग दुसऱ्या डावात दुसरे शतक, तेही नाबाद
ध्रुव जुरेल याने दुसऱ्या डावात हर्ष दुबेच्या साथीनं सातव्या विकेटसाठी २५० चेंडूत १८४ धावांची भागीदारी रचली. हर्ष ८२ धावांवर धावबाद झाला. त्यानंतर ध्रुवनं सलग दुसऱ्या डावात शतकाला गवसणी घातली. भारतीय संघाने ७ बाद ३८२ धावांवर डाव घोषित करत दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर ४१७ धावांचे टार्गेट सेट केले आहे. ध्रुव जुरेल या डावातही १२७ धावा करून नाबाद परतल्याचे पाहायला मिळाले.
तो पंतपेक्षा भारी खेळला, पण...
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १४ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत ध्रुव जुरेल हा संघाचा भाग आहे. पण रिषभ पंत दुखापतीतून सावरुन पुन्हा उप कर्णधाराच्या जबाबदारीसह संघात परतला आहे. त्यामुळे तो प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. या परिस्थितीत ध्रुव जुरेल याच्यासाठी संघात जागा मिळणार की, धडाकेबाज शतकी खेळीनंतरही त्याच्यावर बाकावर बसायची वेळ येणार ते पाहण्याजोगे असेल.