Rinku Singh, IND vs SA 4th T20I Playing 11 prediction: यजमान दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारताची शेवटची टी२० आज जोहान्सबर्ग येथे रंगणार आहे. पहिला सामना भारताने जिंकला होता तर दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेने बरोबरी केली होती. त्यानंतर परवा झालेल्या तिसऱ्या सामन्यात तिलक वर्माच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने आफ्रिकेला ११ धावांनी पराभूत केले. या विजयासह भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजची शेवटची टी२० जिंकून मालिका विजयाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या इराद्याने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघ मैदानात उतरेल. मात्र, गेल्या तीन सामन्यातील कामगिरी पाहता मॅच फिनिशर हे बिरूद मिरवणारा रिंकू सिंग संघाबाहेर होण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी तोलामोलाचा खेळाडूही तयार असल्याची चर्चा आहे.
रिंकू संघाबाहेर, 'या' खेळाडूला मिळणार संधी
आफ्रिकेतील पिच फलंदाजीसाठी पोषक आहेत. या मालिकेत संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या दोघांनी दणदणीत शतके ठोकली आहेत. तसेच इतरही फलंदाजांनी चांगलाच जोर दाखवला आहे. पण रिंकू सिंगला मात्र अद्याप कमाल दाखवता आलेली नाही. रिंकूने पहिल्या सामन्यात ११, दुसऱ्यात ९ तर तिसऱ्या सामन्यात केवळ ८ धावा केल्या. अशा परिस्थितीत आज मालिका विजयाच्या ध्येयाने उतरणाऱ्या संघातून रिंकूला वगळले जाऊ शकते. रिंकूच्या जागी तडाखेबंद फलंदाजीसाठी ओळखला जाणारा जितेश शर्मा याला संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.
चौथ्या टी२० साठी संभावित भारतीय संघ: संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, जितेश शर्मा, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, अर्शदीप सिंग, रवि बिश्नोई, वरुण चक्रवर्ती
तिसऱ्या टी२० मध्ये अर्शदीपचा विक्रम
दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील क्लासेन आणि डेविड मिलर ही मंडळी आउट झाल्यावर भारतीय संघ सामना अगदी सहज जिंकेल, असे वाटत होते. पण मार्को यान्सेन यानं भारताविरुद्ध अवघ्या १६ चेंडूत सर्वात वेगवान T20I अर्धशतक झळकावत सामन्यात रंगत आणली. हार्दिक पांड्याच्या शेवटच्या षटकात मार्कोने तुफान फटकेबाजी करत २६ धावा कुटल्या. अर्शदीप सिंगने अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत त्याचा खेळ खल्लास केला. या विकेटसह अर्शदीप सिंगच्या खात्यात या सामन्यात तिसरी विकेट जमा झाली. ३७ धावा खर्च करून त्याने ३ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. यासोबतच तो आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी जलगदती गोलंदाज ठरला.