India vs Pakistan Cricket ICC Asia Cup 2025 : भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान विरूद्ध सहज विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेकीच्या वेळी आणि सामना संपल्यानंतर, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवनेपाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याच्याशी हस्तांदोलन केले नाही. पाक क्रिकेट बोर्डाच्या माहितीनुसार, पाकिस्तानी कर्णधार भारतीय ड्रेसिंग रुमपर्यंत आला पण भारतीय खेळाडूंनी दरवाजा लावून घेतला. घडलेल्या प्रकारावरून अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतीय कर्णधाराच्या या वर्तणुकीबाबत अधिकृतरित्या निषेधही नोंदवला आहे. त्यासोबतच, आता दुखावलेल्या पाकिस्तानला वाटते की या प्रकरणात खरी चूक मॅच रेफरींची आहे. आणि म्हणूनच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे त्यांना काढून टाकण्याची मागणी केली आहे.
पाक बोर्डाची अजब मागणी
आयसीसीकडे दाखल केलेल्या तक्रारीत पीसीबीने मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्टवर आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय, मॅच रेफरी क्रिकेटच्या खेळभावनेबाबत एमसीसीच्या कायद्याचे पालन करण्यातही अपयशी ठरले आहेत, असे म्हटले आहे. अशा युक्तिवादाचा वापर करून, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मॅच रेफरींविरुद्ध तक्रार केली आहे.
आयसीसी काय निर्णय घेणार?
पाकिस्तानच्या तक्रारीनंतर सर्वांच्या नजरा आयसीसीवर आहेत. काही माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू या मुद्द्यावर आयसीसीवर प्रश्न उपस्थित करताना दिसले आहेत.भारतीय खेळाडूंच्या कृतीवर संतप्त झालेल्या रशीद लतीफने आपल्या सोशल मीडियाद्वारे विचारले की आयसीसी यावर काहीच बोलणार नाही का? बासित अली यांनी आरोप केलाय की, आयसीसीचा बॉस भारतीय असल्याने पाकिस्तान संघासोबत असे वर्तन केवळ आशिया कपमध्येच नाही तर आयसीसी स्पर्धांमध्येही घडेल.
दरम्यान, भारताचा पुढचा सामना १९ सप्टेंबरला ओमानविरूद्ध रंगणार आहे.