Mohammad Shami Team India Squad IND vs NZ: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा आज केली. या संघात अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला पुन्हा एकदा डावलण्यात आल्याने क्रीडा वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दुखापतीतून नुकताच सावरलेल्या श्रेयस अय्यरने संघात पुनरागमन केले आहे. त्याने दुखापतीतून सावरल्यापासून एकही सामना खेळलेला नाही, पण शमी सातत्याने देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळताना दिसतोय. असे असूनही मोहम्मद शमीला संघात न घेतल्याने, त्याची नेमकी चूक काय? असा सवाल विचारला जात आहे.
शमीच्या निवडीबाबत अनपेक्षित निर्णय
मोहम्मद शमीने नुकत्याच झालेल्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये, रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये प्रभावी कामगिरी केली होती. त्याने आपल्या तंदुरुस्तीचा आणि फॉर्मचा पुरावा दिला असतानाही निवड समितीने त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत संधी दिलेली नाही. मार्च २०२५ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर शमी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. यावरून निवड समितीने असे संकेत दिले असल्याची चर्चा आहे की, २०२७ च्या विश्वचषकाच्या दृष्टीने शमीऐवजी युवा वेगवान गोलंदाजांना अधिक प्राधान्य दिले जात आहे.
--
श्रेयस अय्यर आणि शुभमन गिलवर मोठी जबाबदारी
शुभमन गिल या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. श्रेयस अय्यरचे उपकर्णधार म्हणून पुनरागमन झाले आहे, मात्र त्याचे खेळणे बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या 'फिटनेस क्लीयरन्स'वर अवलंबून असेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात क्षेत्ररक्षण करताना श्रेयसच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्याच्या पुनरागमनामुळे फॉर्मात असलेल्या ऋतुराज गायकवाडला संघाबाहेर जावे लागले आहे, जे चाहत्यांसाठी धक्कादायक ठरले आहे.
इतर महत्त्वाचे बदल
यष्टिरक्षक फलंदाज म्हणून ऋषभ पंतची संघात निवड झाली असून ईशान किशनला संधी मिळालेली नाही. अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना आगामी टी-२० विश्वचषकाचा विचार करून वर्कलोड मॅनेजमेंटअंतर्गत विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या अनुपस्थितीत नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांसारख्या युवा खेळाडूंवर गोलंदाजीची मदार असेल.
भारतीय वनडे संघ- शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ही मालिका ११ जानेवारीपासून वडोदरा येथे सुरू होणार आहे. त्यानंतरचे सामने राजकोट आणि इंदूर येथे खेळवले जातील.