Join us

IND vs NZ : हे किवींचे 'ब्रह्मास्त्र'! २५ वर्षांपूर्वी फायनलमध्ये त्यामुळेच झालेला घात; जाणून घ्या सविस्तर

एक नजर टाकुयात २५ वर्षांपूर्वी झालेल्या फायनल सामन्यात काय घडले होते? एक शतक कमी पडले अन् 'रन आउट'मुळे कसा झालेला घात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 12:15 IST

Open in App

IND vs NZ Champions Trophy Final : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या फायनलमध्ये पुन्हा एकदा भारत-न्यूझीलंड यांच्यात जेतेपदाची लढत रंगणार आहे. आयसीसी मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत आतापर्यंत दोन वेळा भारत-न्यूझीलंड हे संघ समोरासमोर आले आहेत. फायनलआधी साखळी फेरीत भारतीय संघानं बाजी मारली आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील न्यूझीलंड विरुद्धच्या लढाईत १-१ अशी बरोबरी केली. आता फायनल जिंकून भारतीय संघ २५ वर्षांपूर्वीच्या पराभवाची परतफेड करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. एक नजर टाकुयात २५ वर्षांपूर्वी झालेल्या सामन्यात काय घडलं होते? एक शतक कमी पडलं अन् 'रन आउट'मुळे कसा घात झाला त्यासंदर्भातील गोष्ट

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

सचिन-गांगुलीची १४१ धावांची दमदार ओपनिंग पार्टनरशिप, पण...

२००० च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत-न्यूझीलंड यांच्यात रंगलेला फायनल सामना नैरोबीच्या मैदानात खेळवण्यात आला होता. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या सामन्या पहिल्यांदा बॅटिंग केलेली. टॉस गमावल्यावर आपल्यावर पहिल्यांदा बॅटिंग करण्याची वेळ आली होती. सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकरनं संघाला दमदार सुरुवात करुन दिलेली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १४१ धावांची दमदार भागीदारी केली. ही जोडी फोडणं गोलंदाजांसाठी मुश्कील झालं असताना किवी संघानं फिल्डिंगच्या जोरावर ही जोडी फोडलेली. स्कॉट स्टायरिसनं सचिनला ६९ धावांवर धावबाद केलं अन् खांदे पडलेल्या न्यूझीलंडच्या गोलंदाजाना त्यानं  दिलासा दिलेला.

द्रविडही झालेला रन आउट

एका बाजूला सौरव गांगुलीनं शतक झळकावलं दुसऱ्या बाजूला मास्टर ब्लास्टर  सचिन तेंडुलकरही सहज शतकाला गवसणी घालेल, असे वाटत असताना भारताला मोठा धक्का बसलेला. ही गोष्ट कमी होती की, काय म्हणून त्याच्या जागी आलेला राहुल द्रविडच्या रुपात आणखी एक विकेट रन आउटच्या रुपातच पडली अन् दमदार सुरुवातीनंतर भारतीय धावगती मंदावली. रन आउटच्या रुपात गमावलेल्या या दोन विकेट्स मॅचमधील मोठा टर्निंग पाइंट ठरला. कारण त्यानंतर भारतीय संघाला धावफलकावर फक्त २६४ धावांच लावता आल्या. दादाच्या शतकावर क्रिस केर्न्सच शतक भारी पडलं अन्  न्यूझीलंडच्या संघाने जेतपदप पटकावलं.

फिल्डिंग हे न्यूझीलंडच 'ब्रह्मास्त्र'

रन आउटच्या मुद्यावर फोकस करण्यामागचं कारण हे की, सध्याच्या घडीला भारतीय संघ भारीच आहे. पण न्यूझीलंडचा संघ आजही फिल्डिंगच्या जोरावर २५-३० धावांचा फरक निर्माण करू शकतो. या धावा सामन्याला कलाटणी देणाऱ्या ठरू शकतात. २५ वर्षांपूर्वी जर भारतीय संघातील दोन विकेट्स रन आउटच्या रुपात पडल्या नसत्या तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असते. मैदान मारून पराभवाची परतफेड करायची असेल तर मागच्या चुका टाळून टीम इंडियाला तिन्ही क्षेत्रात धमक दाखवावी लागेल. 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५भारतीय क्रिकेट संघरोहित शर्माकेन विलियम्सनसौरभ गांगुलीसचिन तेंडुलकरराहुल द्रविड