Shreyas Iyer India A Team IND vs ENG: सध्या IPL 2025 चा हंगाम सुरु आहे. हा हंगाम संपण्याआधीच ३० मे पासून भारताचा अ संघ इंग्लंड दौऱ्यावर खेळणार आहे. भारत अ विरूद्ध इंग्लंड लायन्स असे २ प्रथम श्रेणी सामने आणि एक सराव सामना खेळवला जाणार आहे. यासाठी BCCI ने २० खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे, श्रेयस अय्यरचे नाव यामध्ये समाविष्ट नाही. गेल्या देशांतर्गत हंगामात अय्यरने भरपूर धावा केल्या. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये त्याची चांगली कामगिरी दिसली. त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर तो एकदिवसीय संघात परतला होता. तो कसोटी संघाचाही भाग असेल अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. आता त्याची निवड न होण्याचे कारण समोर आले आहे.
अय्यरची निवड न करण्याचे कारण की...
वृत्तसंस्था आयएएनएसच्या वृत्तानुसार, निवडकर्त्यांसमोर अनेक पर्याय खुले होते. संघ निवडणे हे त्याच्यासाठी कठीण काम होते. ज्या खेळाडूंचे संघ आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमधून बाहेर पडले आहेत किंवा त्यांच्या खेळण्याची शक्यता नगण्य आहे, अशा खेळाडूंची निवड करावी, असा सल्ला बीसीसीआयने दिला. सूत्रांनी सांगितले की, "खूप गोंधळ झाला होता आणि म्हणूनच बीसीसीआयने निवडकर्त्यांना अशा खेळाडूंचा संघ निवडण्याचा सल्ला दिला, ज्यांचे संघ स्पर्धेच्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहेत किंवा बाहेर पडण्याची शक्यता आहे. कारण इंडिया अ साठी निवडलेले खेळाडू २५ मे रोजी इंग्लंडला रवाना होऊ शकतात."
गिल, साई सुदर्शन संघात कसे?
क्रिकेट बोर्डाने अय्यरची निवड न करण्याचे सांगितलेले कारण काहीसे न पटणारे आहे. कारण शुभमन गिलची टीम गुजरात टायटन्स देखील प्लेऑफ आणि फायनलमध्ये पोहोचण्याचा मोठा दावेदार आहे. पण गिल आणि त्याच्या संघाचा सलामीवीर साई सुदर्शन यांची नावे संघात आहेत. हे दोघेही इंग्लंड लायन्स विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यापासून संघात सामील होणार आहेत. त्यामुळे या दोघांना संघात निवडता येते, तर श्रेयस अय्यरलाच वेगळा न्याय का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारत-अ संघ ( India A Sqaud for England Tour)
अभिमन्यू इश्वरन (कर्णधार), ध्रुव जुरेल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, करूण नायर, नितीश कुमार रेड्डी, शार्दुल ठाकूर, ईशान किशन, मानव सुथार, तनुष कोटियन, मुकेश कुमार, आकाश दीप, हर्षित राणा, अंशुल कंबोज, खलील अहमद, ऋतुराज गायकवाड, तुषार देशपांडे, हर्ष दुबे. शुभमन गिल आणि साई सुदर्शन हे दोघेही दुसऱ्या सामन्यापासून उपलब्ध होतील.