Shubman Gill Captaincy, IND vs ENG: टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी कसोटी कर्णधार शुभमन गिलचे कौतुक केले आणि त्याच्या निर्णयांचे समर्थन केले. गिलच्या कर्णधारपदावर आणि मानसिक ताकदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या टीकाकारांचा गौतम गंभीरने खरपूस समाचार घेतला. मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलने भारताच्या दुसऱ्या डावात झुंजार शतक झळकावले. त्याच्या खेळीच्या मदतीने भारतीय संघाने सामना अनिर्णित राखण्याच्या दिशेने पावले उचलली. गिलनंतर, रवींद्र जाडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनीही शतके झळकावली, ज्यामुळे सामना अनिर्णित राहिला.
"गिलने जर शतक केलं नसतं तर..."
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले. "सर्वप्रथम शुभमन गिलच्या प्रतिभेवर कुणीही शंका घेऊ नका. ज्यांना शंका आहे ते फक्त बडबड करतात, त्यांना क्रिकेटची काहीही समज नाही. काही खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थिरावण्यास वेळ घेतात. ड्रेसिंग रूममध्ये कोणीही गिलच्या कामगिरीने आश्चर्यचकित होत नाही. कारण त्याची क्षमता सर्वांना माहिती आहे. जरी त्याने शतक केले नसते तरीही आम्ही त्याला पाठिंबा दिला असता. ज्यांना खरोखर क्रिकेट समजते, त्यांना त्याची क्षमता आधीच माहित आहे. आता तो ते सिद्ध करत आहे.
कर्णधारपद त्याला कधीच ओझं वाट नाही
"जेव्हा शुभमन गिल फलंदाजीसाठी येतो, तेव्हा त्याच्या मनावर कर्णधारपदाचे ओझे नसते. तो कर्णधार म्हणून नाही तर फलंदाज म्हणून मैदानात येतो. शुभमन गिलने सध्याच्या कसोटी मालिकेत ४ शतके झळकावली आहेत. इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत ७००पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिला आशियाई फलंदाज बनला आहे. ही अभिमानाची बाब आहे," असेही गंभीर म्हणाला.
शुबमन गिलवर टीका का झाली?
चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडने ३११ धावांची आघाडी घेतली तेव्हा शुभमन गिलच्या काही निर्णयांवर टीका झाली. शुभमनने मोहम्मद सिराजऐवजी पदार्पणवीर अंशुल कंबोजला नवीन चेंडू दिला. तसेच ६८व्या षटकानंतर वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजी दिली, तोपर्यंत इंग्लंडच्या संघाने त्रिशतकी मजल मारली होती. त्यामुळे गिलवर टीका करण्यात आली होती.