Join us

प्रेरणादायी वडील म्हणून नौशाद यांना 'थार' द्यायला आवडेल, तो माझा सन्मान असेल - महिंद्रा

IND vs ENG 3rd Test Live: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 14:29 IST

Open in App

IND vs ENG 3rd Test Live Updates In Marathi: राजकोटी कसोटी सामन्यातून सर्फराज खानने भारतीय संघात पदार्पण केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे तिकिट मिळवण्यासाठी त्याला बरीच वाट पाहावी लागली. पण वयाच्या २६ व्या वर्षी तो क्षण आला अन् त्याचे स्वप्न साकार झाले. गुरूवारपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या सामन्याला सुरूवात झाली आहे. सर्फराज खानला पदार्पणाची कॅप मिळताच त्याचे वडील नौशाद खान यांना अश्रू अनावर झाले. सर्फराजच्या कुटुंबीयांसाठी हा खूप भावनिक क्षण होता. यावेळी सर्फराजची पत्नी देखील उपस्थित होती. आपल्या पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्याच डावात सर्फराजने अर्धशतकी खेळी करून सर्वांची मनं जिंकली.

अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या चुकीमुळे सर्फराजच्या अप्रतिम खेळीचा अंत झाला. दरम्यान, सर्फराजसाठी त्याच्या वडिलांनी घेतलेली मेहनत, त्यांचे कष्ट अन् जिद्द याची क्रिकेट वर्तुळाला भुरळ पडली. अशातच प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नौशाद खान यांचे कौतुक करताना एक मोठे विधान केले आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नौशाद खान यांना थार भेट देणार असल्याचे सांगितले. 

आनंद महिंद्रा यांनी म्हटले, "हिंमत सोडायची नाही, कठीण परिश्रम, धाडस आणि संयम. मुलाला प्रेरणा देण्यासाठी वडिलांमध्ये आणखी कोणते चांगले गुण असायला हवेत? एक प्रेरणादायी वडील म्हणून नौशाद खान यांनी माझ्याकडून थारची भेट स्वीकारली तर तो माझा बहुमान आणि सन्मान असेल."

दरम्यान, कर्णधार रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि सर्फराज खान यांनी तिसऱ्या सामन्यातील पहिला दिवस गाजवला. आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर रोहितने शतकी खेळी करून डाव सावरला. पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या सर्फराज खानने छोटा पॅकेट बडा धमाका केला. पदार्पणवीर सर्फराजने स्फोटक खेळी करताना अर्धशतक झळकावले पण जडेजाच्या एका चुकीमुळे सर्फराजला बाद व्हावे लागले. खरं तर झाले असे की जड्डू ९९ धावांवर खेळत असताना त्याने एक धाव काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडून चूक झाली अन् सर्फराजला धावबाद व्हावे लागले. जडेजाने धाव घेण्याच्या इराद्याने दुसऱ्या टोकाला असलेल्या सर्फराजला कॉल दिला पण मार्क वुडने सर्फराजला धावबाद करण्यात कोणतीच चूक केली नाही. सर्फराजने १ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ६६ चेंडूत ६२ धावा केल्या.

सामन्यानंतर जडेजाने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्फराजच्या विकेटवर भाष्य केले. आपल्या चुकीमुळे सर्फराज बाद झाल्याची प्रामाणिक कबुली रवींद्र जडेजाने दिली. त्याने इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवत म्हटले की, सर्फराज खानसाठी वाईट वाटते... तो माझा चुकीचा कॉल होता... पण खूप चांगला खेळलास.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडआनंद महिंद्रासर्फराज खानप्रेरणादायक गोष्टीभारतीय क्रिकेट संघ