Team India Playing Xi, Ind vs Eng 3rd T20 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच टी२० मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये होणार आहे. पहिल्या दोन टी२० जिंकल्याने भारताचे मनोबल उंचावले आहे. टीम इंडियाने २०२० नंतर राजकोटमध्ये एकही टी२० सामना हरलेला नाही. तसेच इंग्लंड अद्याप या मैदानावर टी२० खेळलेला नाही. त्यामुळे चाहत्यांचे माप भारताकडे झुकलेले आहे. पण संघातील खेळाडूंच्या निवडीबाबत आणि त्यांच्या भूमिकेबाबत भारताचा माजी फलंदाज आणि समालोचक आकाश चोप्राने (Akash Chopra) सडेतोड मत व्यक्त केले. संघात अक्षर पटेल (Axar Patel), हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर सारखे अष्टपैलू खेळाडू असण्याच्या मुद्द्यावर तो व्यक्त झाला आहे.
काय म्हणाला आकाश चोप्रा?
"जेव्हा तुमच्या संघात खूप जास्त ऑलराऊंडर असतात, तेव्हा अशा प्रकारचा गोंधळ होतो. तुम्ही वॉशिंग्टन सुंदरला खेळवता पण त्याला एकच ओव्हर टाकायला देता. अक्षर पटेलला संघात घेता पण त्याची बॅटिंगची क्रमवारी बदलता. खरं बोलायचं तर जेव्हा तुम्हाला जास्त ऑलराऊंडर संघात मिळतात तेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतात. कोणाला गोलंदाजी कमी मिळते, तर कोणाच्यातरी फलंदाजीवर परिणाम होतो. अक्षर पटेल बाबत मला अजूनही असे वाटते की तो खूप महत्त्वाचा फलंदाज आहे. त्याला आठव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवणे योग्य नाही. भारतीय संघात खेळताना काही वेळा तो तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरही खेळला आहे. वर्ल्डकप फायनलमध्ये तो वरच्या फळीत खेळायला आला आणि त्याने संघाला चांगली धावसंख्या गाठून देण्यास मदत केली होती. अशावेळी इतक्या चांगल्या फलंदाजाला इतक्या खाली खेळवणे योग्य नाही," असे रोखठोक मत आकाश चोप्राने मांडले.
राजकोटमध्ये इंग्लंड प्रथमच खेळणार...
इंग्लंडने तिसऱ्या टी२० साठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. त्यांनी संघात एकही बदल केलेला नाही. दुसऱ्या टी२० मध्ये इंग्लंडने चांगली झुंज दिली होती. अखेरच्या षटकात त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे तिसऱ्या सामन्यातही इंग्लंडचे संघ व्यवस्थापन त्याच खेळाडूंवर विश्वास ठेवताना दिसत आहे. आता इंग्लंडचा संघ राजकोटमध्ये खेळणार असून ते आधी कधीच येथे खेळलेले नाहीत. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात काय घडणार, याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे.