Join us

IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."

Ravi Shastri Jasprit Bumrah, IND vs ENG 2nd Test: दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 19:31 IST

Open in App

Ravi Shastri angry Jasprit Bumrah, IND vs ENG 2nd Test: भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टनच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ या सामन्यात तीन बदलांसह मैदानात उतरला आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी आकाश दीपला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. याशिवाय वॉशिंग्टन सुंदर आणि नीतीश कुमार रेड्डी या दोन अष्टपैलू खेळाडूंवर टीम इंडियाने विश्वास दाखवला आहे. जसप्रीत बुमराह पाचपैकी तीन सामने खेळणार याची कल्पना आधीपासूनच होती. पण दुसऱ्याच कसोटीत त्याला विश्रांती दिल्यामुळे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री प्रचंड संतापले.

"हा सामना खूप महत्त्वाचा होता. त्याआधी आठवड्याभराचा ब्रेक होता. म्हणूनच या सामन्यात बुमराहला विश्रांती दिल्याचे मला आश्चर्य वाटत आहे. असे निर्णय त्याच्या हातातून काढून घेतले पाहिजेत. प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण खेळणार आणि कोण खेळणार नाही याचा निर्णय कर्णधार आणि कोच यांनीच घ्यायचा आहे. संपूर्ण मालिकेच्या दृष्टीने आजचा सामना हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुमचा सर्वोत्तम गोलंदाज तुम्ही खेळवायला हवाच होतात. लॉर्ड्सच्या मैदानावरील सामना खूप नंतर आहे. पहिला सामना गमावल्यामुळे या सामन्यात कमबॅक करणे महत्त्वाचे होते. अशावेळी बुमराला बाहेर बसवणे योग्य नाही," असे रोखठोक मत रवी शास्त्रींनी मांडले.

"हा सामना बुमराहला खेळवायला हवा होता. मालिकेत बरोबरी साधणे गरजेचे होते. त्यानंतर लॉर्ड्सच्या कसोटीसाठी त्याला खेळायचे आहे की नाही हा पर्याय देता आला असता. गेल्या काही कसोटी सामन्यांचा विचार करता, टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी गमावल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन कसोटी मॅच हरल्या आणि इंग्लंडविरुद्धही पहिली कसोटी गमावली. अशा वेळी भारताला लवकरात लवकर विजयी मार्गावर परतणे गरजेचे आहे आणि त्यासाठी तुमचा सर्वोत्तम गोलंदाज संघात असायलाच हवा. आठवड्याभराच्या ब्रेकनंतरही तुमचा महत्त्वाचा गोलंदाज जर संघाबाहेर विश्रांतीसाठी बसत असेल, तर ही गोष्ट त्याच्या पचणे खूपच कठीण आहे. हे मला पटतच नाहीये," असेही रवी शास्त्री म्हणाले.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५रवी शास्त्रीजसप्रित बुमराहगौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघशुभमन गिलइंग्लंड