गत वर्ल्ड चॅम्पियन भातीय संघाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडला पराभूत करत अहमदाबाचं तिकीच बूक केलं. पाटा (सपाट) खेळपट्टीवर पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दुसऱ्यांदा २५० पेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम केला. या धावांचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना खिंडार पाडले. तरीही इंग्लंडच्या संघाने जेकब बेथलच्या दमदार खेळीच्या जोरावर सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. इथं जाणून घेऊयात हाय स्कोअरिंग मॅचमधील असे ५ क्षण ज्यामुळे सेमीफायनलचा निकाल भारताच्या बाजूनं फिरला.
हॅरी ब्रूकची कृपा अन् संजूचा धमाका
भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगलेल्या सेमीफायनलमध्ये धावांची अक्षरश: 'बरसात' झाली. अभिषेक शर्मा सोडला तर प्रत्येकाने उपयुक्त योगदाना देत भारताच्या धावफलकावर मोठी धावसंख्या लावला. यात संजू सॅमसन हा सर्वात आघाडीवर होता. सलग दुसऱ्यांदा अर्धशतक झळकवणारा संजू पुन्हा एकदा शतकाच्या जवळ पोहचला होता. पण विल जॅक्सनं ८९ धावांवर त्याच्या खेळीला ब्रेक लावला. हॅरी ब्रूकचा हातभार अन् संजूची धमाकेदार खेळी हा भारतीय संघासाठी सामन्यातील एक महत्त्वाचा क्षण होता. इंग्लंडचा कर्णधाराने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर संजू १५ धावांवर खेळत असताना सोपा झेल सोडला. नशिबाची साथ मिळाल्यावर संजूनं धमाका केला.
बुमराहच्या गोलंदाजीवर विकेट मिळाल्याचा गैरसमज! साक्षीचा जल्लोष पाहून MS धोनीला हसू अनावर (VIDEO)
IND vs ENG Semi-Final Match Highlights
अक्षर पटेलची सुपर फिल्डिंग
अक्षर पटेल याने भारतीय संघाला फायनलमध्ये पोहचवण्यात मोलाची भूमिका बजावली. आधी त्याने बुमराहच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या कर्णधार हॅरी ब्रूकचा अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर जेकब बेथल आणि विल जॅक्सची सेट झालेली जोडीही त्याने आपल्या फिल्डिंगच्या जोरावर फोडली. विल जॅक्स त्याने शिवम दुबेच्या साथीनं घेतलेला झेल टीम इंडियाला मोठा दिलासा देणारा होता.
जसप्रीत बुमराहचे ते षटक
जसप्रीत बुमराहनं आधी कमालीच्या फॉर्ममध्ये असलेल्या हॅरी ब्रूकला चालते केले. त्यानंतर अखेरच्या टप्प्यात त्याने जगातील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. १७ व्या षटकात इंग्लंडच्या संघाने २०९ धावा केल्या होत्या. अखेरच्या ३ षटकात त्यांना १५ च्या सरासरीसह ४५ धावांची गरज होती. वानखेडेच्या मैदानात हे आव्हानात्मक नव्हेत. त्यात बेथल मैदानात होता. दोन मोठे फटके अन् सामना इंग्लंडचा अशी ती परिस्थिती होती. पण सूर्यानं १८ व्या षटकातच बुमराहच्या हाती चेंडू सोपवला. या षटकात जस्सीनं फक्त ६ धावा खर्च केल्या. हे षटक टीम इंडियाला मॅचमध्ये आणणारे होते.
हार्दिक पांड्यानंही डेथ ओव्हरमध्ये बजावली चोख भूमिका
बुमराहचा कोटा पूर्ण झाल्यावर दोन षटके कोण टाकणार? धावांची बरसात सुरु असताना कोणता गोलंदाज त्याला अंकूश लावणार हा एक मोठा प्रश्न होता. पण हार्दिक पांड्याने त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी चोख बजावली. १२ चेंडूत ३९ धावांची गरज असताना अखेरच्या षटकात त्याने शिवम दुबेला ३० धावा ठेवल्या. या षटकातही २१ धावा झाल्या. त्यामुळे १८ वे आणि १९ षटक महत्त्वाचे ठरले ते वेगळे सांगण्याची गरज नाही.
विक्रमी शतकवीर बेथल रनआउट झाला अन्...
शेवटच्या षटकात ३० धावांची गरज असताना सामना भारताच्या बाजूनं फिरला. पण बेथल मैदानात असल्यामुळे काय होईल? याची चिंता होतीच. शिवम दुबे गोलंदाजीला आला आणि त्याच्या पहिल्याच चेंडूवर दुहेरी धाव घेण्याच्या नादात बेथलच्या अविस्मरणीय खेळीला ब्रेक लागला. ही विकेट फायनलचा मार्ग शंभर टक्के मोकळा झाला हा विश्वास देणारी होती.