- अयाज मेमन
(कन्सल्टिंग एडिटर)
भारताने सुपर आठ फेरीतील स्थान अखेरच्या साखळी सामन्याआधीच निश्चित केले. अ गटात अव्वल स्थान पटकावल्यानंतर शनिवारी भारतीय संघ कॅनडाविरुद्ध खेळेल. भारताने सातत्यपूर्ण कामगिरी करत हा सामनाही मोठ्या फरकाने जिंकायला पाहिजे. या सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन संघात काही बदल करणार की तोच संघ खेळणार याकडे लक्ष लागले आहे.
कारण विराट कोहलीला अद्याप आपल्या लौकिकानुसार खेळता आलेले नाही. त्यामुळे त्याच्या जागी सलामीवीर म्हणून यशस्वी जैस्वालला संधी मिळणार का? त्याचबरोबर गोलंदाजांमध्येही काही बदल होणार का, हे पाहावे लागेल. आता स्पर्धेतील आव्हान हळूहळू कठीण होणार आहे, त्याआधी प्रत्येक संघ आपली बाजू भक्कम करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.
गोलंदाजांचे योगदान मोलाचे
गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने कमालीचा दबदबा राखला आहे, तो प्रमुख गोलंदाज आहे, यात वाद नाहीच. पुढील फेरीतील काही सामन्यांत फिरकीपटूंची भूमिका मोलाची ठरणार असून अशावेळी कुलदीप यादव- युझवेंद्र चहल ही जोडी खेळणार का हे पाहावे लागेल. आतापर्यंत अक्षर पटेल आणि जडेजा सामन्यांत खेळले असून दोघांनी समाधानकारक कामगिरी केली आहे. दोघेही एकसारखेच खेळाडू आहेत. दोघांपैकी अक्षरने काही प्रमाणात चांगली कामगिरी केली आहे,
जडेजाला मात्र फलंदाजीतही चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. तसेच, त्याला बळी मिळवणे सर्वात महत्त्वाचे ठरणार आहे. जडेजा फॉर्ममध्ये आल्यास संघाचा ताळमेळ मजबूत होईल. हार्दिकच्या कामगिरीतही सातत्य राहिले तर भारतीय संघ आणखी मजबूत बनेल. अर्शदीप सिंगनेही शानदार गोलंदाजी केली असून तो बुमराहला चांगली साथ देतोय. मोहम्मद सिराज चांगला मारा करतोय, पण त्याला बळी मिळवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल.
कोहलीचा दर्जा सर्वांना माहितेय
विराट कोहलीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. सलामीला तो अपयशी ठरल्याने त्याच्या फलंदाजी क्रमवारीत बदल करण्यात यावे, यावर अनेकांचे मत आहे. माझ्या मते या स्पर्धेसाठी संघाची पूर्ण तयारी रोहित शर्मा-विराट कोहली या सलामी जोडीच्या अनुषंगाने झाली आहे. त्यामुळे काही सामन्यांत अपयश आल्यानंतरही यामध्ये बदल करू नये, असे माझे मत आहे. कारण, यामुळे पुन्हा एकदा नव्याने संघ बांधणी करावी लागेल. अडचणीच्या स्थितीत बदल करावा लागला, तर वेगळी गोष्ट आहे. पण, यामध्ये बदल करू नये, असे माझे मत आहे. कोहली सुरुवातीला जरी अपयशी ठरला असला, तरी त्याचा दर्जा आणि त्याची क्षमता सर्वाना माहीत आहे. कोहलीचे लयीत येणे भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि यासाठी कॅनडाविरुद्धचा सामना मोठी संधी आहे.
संघाची फलंदाजी खोलवर
पहिले तिन्ही सामने न्यूयॉर्कमध्ये खेळल्यानंतर भारताला आता फ्लोरिडामध्ये खेळायचे आहे. त्यामुळे येथील खेळपट्टीचा अभ्यासही महत्त्वाचा ठरणार आहे. येथे याआधी काही सामने खेळलेले असल्याने भारतीय संघाकडे येथील अनुभवही आहे. कोहलीचा अपवाद वगळता भारताचे सर्व फलंदाज चांगल्या लयीत आहेत. संघाची फलंदाजीही खोलवर आहे. ऋषभ पंतने सर्वांना चकित केले, शिवम दुबे फॉर्ममध्ये येतोय, हार्दिक पांड्या चांगली फलंदाजी करतोय आणि गेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवने नाबाद अर्धशतक झळकावत भारताची बाजू आणखी भक्कम केली आहे. कोहलीप्रमाणेच रवींद्र जडेजाही फलंदाजीत अपयशी ठरला आहे. दोघेही शानदार टी-२० खेळाडू असल्याने लवकरच दोघेही फॉर्ममध्ये येतील.
सामन्याची वेळ : रात्री ८ वाजल्यापासून (भारतीय वेळेनुसार)
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस
लाईव्ह स्ट्रिमिंग : हॉटस्टार