Join us

IND vs BAN: भारताचा विजय, रोहितचा मोठा पराक्रम! पॉन्टींगसह अनेक दिग्गजांना टाकलं मागे

Rohit Sharma Record, Champions Trophy 2025 IND vs BAN: भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात मिळवला दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 17:23 IST

Open in App

Rohit Sharma Record, Champions Trophy 2025 IND vs BAN: भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या संघाला ६ गडी राखून पराभवाची धूळ चारली. भारताविरूद्ध प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने तौहिद हृदयचे शतक आणि जाकर अलीच्या अर्धशतकाच्या बळावर ४९.४ षटकांत सर्वबाद २२८ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना शुबमन गिलने नाबाद शतक आणि रोहित, राहुलच्या दमदार खेळींच्या जोरावर भारताने हा सामना ४६व्या षटकातच जिंकला. हा विजयासह कर्णधार रोहित शर्माने एक मोठा पराक्रम केला.

'कॅप्टन' रोहितचे अनोखे शतक

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात विजयाने केली. दुबईमध्ये बांगलादेशला हरवण्यासोबतच भारतीय कर्णधाराने एक खास शतकही झळकावले. रोहितने कर्णधारपद भूषवताना १०० आंतरराष्ट्रीय सामने जिंकले. रिकी पॉन्टिंग सोबतच तो हा पराक्रम करणारा सर्वात जलद कर्णधारही बनला आहे. रोहितनेही पॉन्टींगप्रमाणे फक्त १३९ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. या काळात त्याने १०० सामने जिंकले, तर ३३ सामन्यांमध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला. पण एका गोष्टीत मात्र त्याने पॉन्टींगसह अनेक दिग्गजांना मागे सोडले आहे.

रोहित 'या' बाबतीत अव्वल

रोहितने आतापर्यंत त्याच्या नेतृत्वाखाली ७३ टक्के सामने जिंकले आहेत, जे इतर कोणत्याही कर्णधारापेक्षा सर्वाधिक आहे. त्याने विजयाच्या टक्केवारीच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचे दिग्गज कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि स्टीव्ह वॉ यांनाही मागे टाकले आहे. पॉन्टिंगने ३२४ पैकी २२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकले होते. त्याचा विजयाचा टक्का ६७.९० होता. तर वॉ याने १६३ पैकी १०८ सामने जिंकले होते आणि त्याचा विजयाचा टक्का ६६.२५ होता. रोहितने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज कर्णधार हॅन्सी क्रोनिएलाही मागे टाकले आहे. त्याचा विजयाचा टक्का ६५.९६ होता. कर्णधार असताना त्याने १९१ पैकी १२६ सामने जिंकले. तर भारताकडून सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या विराट कोहलीचा विजयाचा टक्का ६४ इतका आहे.

 

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५भारतरोहित शर्माबांगलादेशभारत विरुद्ध बांगलादेशभारतीय क्रिकेट संघविराट कोहली