Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN Test: भारताने दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात पाचव्या दिवशी बांगलादेशला पराभूत केले. सुमारे तीन दिवसांचा खेळ वाया गेल्यामुळे सामना अनिर्णित राहिल असा बहुतांश क्रिकेटरसिकांचा अंदाज होता. पण भारतीय संघाने वेगळ्या पद्धतीचा खेळ करून कसोटी क्रिकेटला कलाटणी देणारा पराक्रम केला. भारताने बांगलादेशला दोनही कसोटी सामन्यांत हरवून मालिकेत २-० असा विजय मिळवला. या विजयासह भारताच्या रोहित शर्माने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत विराट कोहलीच्या पराक्रमाला मागे टाकले.
या विजयासह डब्ल्यूटीसी गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या भारताचे ११ सामन्यांत ८ विजय, दोन पराभव आणि एक बरोबरी असे ९८ गुण झाले आहेत. भारताची विजयाची टक्केवारी ७४.२४ टक्के एवढी आहे. ऑस्ट्रेलिया १२ सामन्यांत ८ विजय, तीन पराभव आणि एक ड्रॉसह ९० गुणांसह ६२.५० टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.
रोहितने विराटला केलं 'ओव्हरटेक'
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने आतापर्यंत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली १८ पैकी १२ सामने जिंकले आहेत. यासह, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या विजयाची टक्केवारी आता सर्वाधिक म्हणजेच ६६.६६ इतकी झाली आहे. संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या स्पर्धेत पहिल्या स्थानावर आहे. बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील विजयासह रोहित शर्माने डब्ल्यूटीसी इतिहासात विराट कोहलीला 'ओव्हरटेक' केले. कर्णधार म्हणून विराटची विजयाची टक्केवारी ६३.६३ होती. हा पराक्रम रोहितने मोडून काढला.
डब्ल्यूटीसीच्या इतिहासातील विजयाच्या टक्केवारीनुसार कर्णधार रोहित पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंडचा बेन स्टोक्स आणि ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स देखील रोहितच्या जवळपास आहेत.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत विजयाच्या टक्केवारीनुसार-
१. रोहित शर्मा (१८ कसोटीत १२ विजय) - ६६.६६
२. विराट कोहली (२२ कसोटीत १४ विजय) - ६३.६३
३. बेन स्टोक्स (२४ कसोटीत १५ विजय)- ६२.५०
४. पॅट कमिन्स (२८ कसोटीत १७ विजय)- ६०.७१
५. टिम पेन (१४ कसोटीत ८ विजय) - ५७.१४