Join us

IND vs BAN live: विराटचा अप्रतिम झेल पाहून सगळेच 'शॉक', शाकिब अल हसनचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यात वनडे मालिका खेळवली जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 17:29 IST

Open in App

ढाका : सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यात वनडे मालिका खेळवली जात आहे. आज या मालिकेतील सलामीचा सामना ढाका येथे पार पडत आहे. यजमान संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारताने ४१.१ षटकांत सर्वबाद १८६ धावा केल्या, ज्याचा पाठलाग करताना बांगलादेशने साजेशी सुरूवात केली आहे. बांगलादेशने आपल्या डावाच्या २७ षटकांपर्यंत ४ बाद १०६ एवढ्या धावा केल्या आहेत. अद्यापही यजमान संघाला मालिकेत विजयी सलामी देण्यासाठी ८१ धावांची आवश्यकता आहे. मात्र भारतीय संघाने ४ गडी बाद करून सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने शाकिब अल हसनचा शानदार झेल घेऊन सर्वांचे लक्ष वेधले. विराटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. विराटने वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर शाकिबचा अप्रतिम झेल करून शानदार कामगिरी केली. 

शाकिब अल हसनने पटकावले ५ बळी 

रोहित शर्माविराट कोहलीलोकेश राहुल यांच्या पुनरागमनामुळे भारताची फळी मजबूत होईल असे वाटले होते, परंतु बांगलादेशच्या शाकिबने लैय भारी कामगिरी केली. रोहित शर्माचा आज चार अष्टपैलू खेळाडूंसह खेळण्याचा प्रयोग फसला, १९, ०, २, ० अशा धावा करून ते माघारी परतले. लोकेश राहुल (KL Rahul) एकटा खिंड लढवत होता. शाकिबने १० षटकांत ३६ धावांत ५ विकेट्स घेतल्या. 

रोहित व शिखर धवन ही नियमित जोडी सलामीला मैदानावर उतरली. सहाव्या षटकात भारताला पहिला धक्का बसला. धवन रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात ७ धावांवर त्रिफळाचीत झाला. रोहित व विराट कोहली यांनी चांगली खेळी केली होती, परंतु शाकिब अल हसनने एकाच षटकात दोघांना बाद केले. त्याने रोहितला ( २७) त्रिफळाचीत केले, तर तिसऱ्या चेंडूवर विराटचा ( ९) लिटन दासने अफलातून झेल घेतला. श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांची ५६ चेंडूंत ४३ धावांची भागीदारी इबादत होसैनने संपुष्टात आणली. श्रेयस २४ धावांवर झेलबाद झाला. 

लोकेश संभाळून खेळत होता आणि यावेळेस त्याला वॉशिंग्टन सुंदरची चांगली साथ मिळाली. त्याने लोकेशसह पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. लोकेशनेही ४९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पण, शाकिब अल हसन पुन्हा टीम इंडियाच्या आडवा आला अन् सुंदरला त्याने १९ धावांवर माघारी पाठवून लोकेशसह ६० धावांची भागीदारी संपुष्टात आणली. शाहबाद अहमद आला तसा गेला, शाकिबने अप्रतिम झेल टिपला. शाकिबने त्यानंतर दोन धक्के दिले. शार्दूल ठाकूर ( २) व दीपक चहर ( ०) यांना त्याने बाद करताना डावात पाच विकेट्स घेतल्या. 

भारताची अवस्था ३४.४ षटकांत ८ बाद १५८ अशी झालीय आणि ते ५० षटकं तरी खेळून काढतील का अशी शंका निर्माण झालीय. १५२ वर चौथी विकेट पडली आणि त्यानंतर १५८ पर्यंत चार धक्के बसले. आता लोकेशकडे आक्रमक खेळ करून धावा वाढवण्यापलीकडे दुसरा पर्यात नव्हता. याच प्रयत्नात तो अनामुल हकच्या हाती झेल देऊन परतला. एबादत होसैनने ही विकेट घेतली. लोकेशने ७० चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ७३ धावा केल्या. शाकिबची ( ५-३६) कामगिरी ही भारताविरूद्ध वन डे क्रिकेटमधील डावखुऱ्या फिरकीपटूची सर्वोत्तम कामगिरी ठरली. इबादत होसैनने चौथी विकेट्स घेताना भारताचा डाव १८६ धावांवर गुंडाळला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशविराट कोहलीवॉशिंग्टन सुंदरलोकेश राहुलभारतीय क्रिकेट संघ
Open in App